कोल्हापूर

कोल्हापूर: एसटी वेळेवर येईना; विद्यार्थी घरी पोहोचेना: शिरोळमध्ये एसटी बसचा तुटवडा

अविनाश सुतार


कुरुंदवाड: शिरोळ तालुक्यातील खेडोपाडीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तासन्तास एसटी बसची वाट पाहत बसावे लागत आहे. अनेक वेळा वेळेवर बस न आल्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. कुरुंदवाड बस डेपोचे व्यवस्थापक आणि कर्मचारी बस गाड्या कमी आहेत. बस गाड्या वाढवून मिळविण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना भेटा, अशी तक्रार करणाऱ्या प्रवाशांना सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, जयसिंगपूर, शिरोळ येथे जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. खिद्रापूर पासून ते शिवनाकवाडी, अब्दुललाट ते निमशिरगाव-दानोळी-उमळवाड, उदगाव ते चिंचवाड, कुटवाड-कनवाड ते नृसिंहवाडी आणि नदीपलीकडील सात गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी यावे लागते.

या परिसरातून गेल्या दोन महिन्यांपासून एस. टी. बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत स्थानकावर बसची वाट पाहत बसावे लागत आहे. राज्य सरकारने 'बेटी बचाव, बेटी पढाव'ची घोषणा केली आहे. मात्र, बस सेवेअभावी मुलींना सायंकाळी सात वाजले तरी कोणतेही वाहन उपलब्ध होत नाही. तसेच, बसस्टॉपवरदेखील बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसते. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. वेळेवर मुले घरी नाही आली, तर पालकांना स्वत:ची गाडी घेऊन जावे लागत आहे.

शिरोळ तालुक्यामधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठ्या शहरात जावे लागते. त्यासाठी त्यांना एसटीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. शहरातील शाळा सायंकाळी पाच वाजता सुटतात. मात्र, एसटी बस वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना सायंकाळी सात वाजेपर्यंत स्थानकावरच बसावे लागत आहे. मुली वेळेत घरी न पोहोचल्यामुळे घरातील पालक चिंतेत असतात. या अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दीपक पाटील, सैनिक टाकळी

आम्हाला शासनाने वेळेवर बस उपलब्ध करून द्यावी. बस वेळेत येत नसल्याने आम्हाला शाळेतील अभ्यास पूर्ण करता येत नाही. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच, आमच्या भागात मोबाईलला रेंज नसल्यामुळे घरीदेखील काही संपर्क होत नाही. त्यामुळे आम्ही घरी पोहोचेपर्यंत पालकदेखील चिंतेत असतात.

– विद्यार्थिनी

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT