कोल्हापूर : यंदाच्या दिवाळीतच थेट पाईपलाईनने अभ्यंगस्नान | पुढारी

कोल्हापूर : यंदाच्या दिवाळीतच थेट पाईपलाईनने अभ्यंगस्नान

कोल्हापूर : शहरवासीयांच्या जिव्हाळ्याच्या थेट पाईपलाईन योजनेचे काम 97 टक्के काम पूर्ण झाले आहे. दसर्‍यात काळम्मावाडी धरणातील पाणी पुईखडीतील जल शुद्धीकरण केंद्रात पडेल. यंदाच्या दिवाळीत कोल्हापूरकर थेट पाईपलाईन योजनेच्या पाण्यानेच अभ्यंगस्नान करतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची तारीख घेऊन योजनेचे लोकार्पण केले जाईल, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

48 कि. मी. टेस्टिंग पूर्ण

कोल्हापूर महापालिकेत थेट पाईपलाईन योजनेसह विविध विषयांचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ पत्रकारांशी बोलत होते. प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूरला स्वच्छ व मुलबक पाणी मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात 488 कोटींची थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली. योजनेला 31 मे 2022 पर्यंत सहावेळा मुदतवाढ दिली आहे. 53 किलोमीटर लांबीची पाईपलाईन असून 48 कि. मी. टेस्टिंग पूर्ण झाले आहे. कोल्हापूरसाठी काळम्मावाडी धरणातील एक टीएमसी पाणीसाठा राखीव आहे.

अमृत योजना मार्चअखेर पूर्ण

युती सरकारने योजना पूर्णत्वास जाण्यासाठी सहकार्य केले. माझ्या पालकमंत्रिपदाच्या कालावधीत योजना पूर्ण झाल्याची सुवर्णसंधी मिळाली. कोल्हापूर शहरात पाणी वितरणासाठी अंतर्गत जलवाहिन्या टाकणे आणि उंच टाक्या बांधण्यासाठी अमृत योजनेंतर्गत 115 कोटींची कामे सुरू आहेत. त्यातील 12 पैकी 8 टाक्यांची कामे मार्च 2024 अखेर पूर्ण होतील. महापालिकेने थेट पाईपलाईन योजनेचे पाणी कसबा बावड्यासह इतर जल शुद्धीकरण केंद्राद्वारे शहरात पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.

Back to top button