शिरोली एमआयडीसी : कोल्हापूर हद्दवाढीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. या हद्दवाढीविरोधात हद्दवाढीत येणाऱ्या अनेक गावात आंदोलन सुरू आहेत. पुलाची शिरोली येथे हद्दवाढ होऊ नये, यासाठी मंगळवारी (दि.१७) पाण्याच्या टाकीवर चढून अनोखे आंदोलन करण्यात आले. येथील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.
कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत असणाऱ्या गावांना नगरपालिका मुलभूत सुविधा उपलब्ध करून देत नाही. तर हद्दवाढ करून समाविष्ट केलेल्या गावांना काय सुविधा देणार? असा प्रश्न उपस्थित करून ग्रामपंचायतकडून आम्हाला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेकडून फक्त उत्पन्न वाढविण्यासाठी होणारी हद्दवाढ ही आमच्या ग्रामीण जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे या हद्दवाढीविरोधात आम्ही तीव्र आंदोलन सुरू करू, असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला. तर शिरोली गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद व्हावी, अशी मागणी यापूर्वी केलेली आहे. हद्दवाढ न करता ही मागणी करण्यात आला असून या मागणीचा शासनाने विचार करावा, असेही आंदोलक यावेळी म्हणाले.