

सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या करूळ घाटात आज सकाळी दरड कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सकाळी सुमारे ९ वाजता घाटमाथ्यावरून मातीचा मोठा मलबा आणि खचलेली दरड रस्त्यावर आली. या घटनेमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या असून, प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही दिलासा देणारी बाब ठरली आहे.
माहितीनुसार, गेल्या काही तासांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जमिनीची पकड सैल होऊन दरड खाली आली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या यंत्रणेकडून मलबा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर साचल्याने वाहतूक पुन्हा पूर्ववत होण्यासाठी अजून काही वेळ लागण्याची शक्यता आहे.
स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना या मार्गावर प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर दरम्यानचा महत्त्वाचा संपर्क मार्ग असलेल्या करूळ घाटात अशा प्रकारे वाहतूक बंद होणे ही वारंवार घडणारी समस्या ठरत आहे. त्यामुळे घाट रस्ता सुरक्षित ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.