

कोल्हापूर : कोल्हापूर, इचलकरंजी आणि सांगलीसह राज्यातील ‘ड’ वर्ग महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचना 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत प्रसिद्ध होणार आहे. नगरविकास विभागाने गुरुवारी यासंबंधीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला असून, संबंधित महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांना तत्काळ कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला आता वेग आला आहे.
दोन दिवसांपूर्वीच नगरविकास विभागाने प्रभाग रचना करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार आता संबंधित महापालिकांमध्ये आवश्यक प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. प्रारूप प्रभाग रचना एका महिन्यात तयार करणे बंधनकारक असून, ती 4 ते 8 जुलैदरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागणार आहे. नगरविकास विभागाने दिलेल्या या कालबद्ध कार्यक्रमानुसार हे काम वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित महापालिका आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे.
अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याची प्रक्रिया हरकतींवरील सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 1 ते 7 ऑगस्टदरम्यान अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाईल. ही अंतिम रचना जिल्हाधिकार्यांमार्फत राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर, अंतिम प्रभाग रचना 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत अधिकृतरीत्या जाहीर केली जाईल.