MahaDBT Pudhari
कोल्हापूर

MahaDBT Portal Down | शिरोळ तालुक्यात पशुधन योजनेचा प्रारंभच तांत्रिक अडचणीत; महाडीबीटी पोर्टल ठप्प

शिरोळ तालुक्यातील इच्छुक शेतकऱ्यांची धावपळ

पुढारी वृत्तसेवा

Shirol Livestock Scheme

कुरुंदवाड : पशुधन व्यवसायाला चालना देऊन ग्रामीण भागातील शेतकरी आणि बेरोजगार युवकांना आर्थिक बळ देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सुरू केली आहे. मात्र, योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्सुक असलेल्या शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्याच दिवशी ऑनलाइन तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. योजना सुरू झाली; पण अर्ज करण्यासाठीचे महाडीबीटी २.० पोर्टलच अडखळल्याने इच्छुकांचा उत्साह मावळला आहे.

गुरुवारी (दि. २६) सायंकाळी ४ वाजले पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाले पासून अनेकांनी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव केली होती. गाय-म्हैस पालन, शेळीपालन, कुक्कुटपालन तसेच पशुधनासाठी शेड आणि चारा व्यवस्थापन अशा विविध घटकांसाठी अनुदान मिळणार असल्याने ग्रामीण भागातून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

मात्र, पोर्टलवर एकाच वेळी मोठ्या संख्येने अर्जदारांनी लॉगिन करण्याचा प्रयत्न केल्याने सर्व्हर संथ झाला. काही ठिकाणी संकेतस्थळ उघडत नसल्याने, तर काही ठिकाणी लॉगिन आणि फार्मर आयडी पडताळणी होत नसल्याने अर्ज भरणे अशक्य झाले.

विशेष म्हणजे लाभार्थी निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या निकषावर होणार असल्याने तांत्रिक अडचणींमुळे आपली संधी हुकणार नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. शासनाने पोर्टल सुरळीत करून अर्जासाठी पुरेसा कालावधी द्यावा, अशी मागणी होत आहे.

अर्जदारांची संधी धोक्यात?

योजनेसाठी अर्ज करण्याची तयारी करून बसलेल्या शेतकऱ्यांना पोर्टलच्या अडचणींमुळे अर्ज करता आलेले नाहीत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या निकषामुळे वेळेत अर्ज न झाल्यास पात्र लाभार्थी संधीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व्हर दुरुस्त करून अर्ज प्रक्रियेची मुदत वाढवावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT