

शिरोली पुलाची : येथील दागाड पश्चिम नदी परिसरात शॉर्टसर्किटमुळे पोल्ट्री शेडला आग लागून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास शामराव मारुती पाटील यांच्या पोल्ट्री शेडमध्ये ही दुर्घटना घडली.
पहाटेच्या सुमारास शेडमधील विद्युत वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत दोन लाख रुपये किमतीची इलेक्ट्रिक वायरिंग, एक लाख रुपयांचे कूलिंग पॅड, दोन लाख रुपयांच्या ताडपत्री, चार लाख रुपये किमतीची पक्ष्यांची १८० भांडी, एक लाख रुपयांचे प्लंबिंग पाईप आणि २० हजार रुपये किमतीची कोंबडी खाद्याची दहा पोती जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच वीज मंडळाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शिरोलीचे महसूल अधिकारी महेश सूर्यवंशी, महसूल सेवक संदीप पुजारी आणि भरत परमाज यांनी नुकसानीचा पंचनामा केला.
दरम्यान, सरपंच पद्मजा कृष्णात करपे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, दत्त पतसंस्थेचे अध्यक्ष राजहंस पाटील, शिंदेसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद पाटील यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.