

दिलीप भिसे
कोल्हापूर : दगडाला आकार देऊन त्यात परमेश्वर शोधणाऱ्या सायबर चौक परिसरातील पाथरूट वसाहतीमधील पाथरूट कुटुंबांवर रविवारी रात्री अचानक दु:खाचा डोंगर कोसळला. कुटुंब प्रमुख असलेल्या उमेश पाथरूट (वय ३२) आणि गणेश पाथरूट (३४) या सख्ख्या चुलतभावांचा शिवाजी विद्यापीठ-शाहू नाका रोडवरील भीषण अपघातात मृत्यू झाला. पोटासाठी आयुष्यभर धडपड करणाऱ्या तरुणांच्या मृत्यूमुळे भरला संसार उघड्यावर आला. वृद्धापकाळाकडे झुकलेले आई, वडील, त्यांच्या अर्धागिणी अन् चिमुरड्या मुलांचा आधारवड हरपला.
पाषाणापासून देव-देवतांच्या सुबक मूर्ती घडविण्यात पाथरूट बंधूंचा हातखंडा... सायबर चौकासह पन्हाळा-जोतिबा रोडवर झाडाच्या आडोशाला पावसाळा असो वा रणरणत्या उन्ह्यात किंबहुना हुडहुडी भरणाऱ्या थंडीतही पाथरूट बंधूंची कुटुंबासाठी धडपड सुरूच असायची... रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या पाथरूट बंधूंच्या आयुष्याला आता कोठे तरी आशेचा किरण दिसत होता.
रविवारची काळरात्र... आक्रीतच घडलं... होत्याचं नव्हतं झालं!
घरची परिस्थिती म्हणजे अठराविश्व दारिद्र्य... पोटासाठी आयुष्यभर भटकंती... शिक्षणाचा पत्ता नाही, परिणामी चांगल्या पगाराची उपेक्षा... कष्ट केल्याशिवाय पोटापाण्याचा प्रश्न सुटणार नाही, अशाच परिस्थितीतून पाथरूट बंधूंसह कुटुंबीयांची वाटचाल सुरू असतानाच रविवारी रात्री ‘आक्रीत घडलं अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं...’
भीषण घटनेमुळे संसार उघड्यावर!
शिवाजी विद्यापीठ रोडवरील हॉटेलमधून जेवण करून परतणाऱ्या मोपेडला भरधाव मोटारीने जोरात धडक दिली. उमेश, गणेश दहा-बारा फूट उंचीवर फेकले गेले. डोळ्याची पापणी लवते न लवतेच तोच रस्त्यावर कोसळले. डोक्याला गंभीर इजा होऊन दोघांचा मृत्यू झाला. कष्टाने उभारलेला दोघांचा संसार क्षणार्धात उघड्यावर आला.
कष्टातून संसार उभारला अन् जिव्हाळाही जोपासला!
आपण... आपलं काम... आपलं कुटुंब सांभाळत पाथरूट बंधूंनी परिसरातील तरुणामध्ये जिव्हाळ्यासह आपुलकीचे नाते निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने सायबर चौकच काय, राजारामपुरीसह परिसरात शोककळा पसरली. आधारवड नाहीसा झालेल्या कुटुंबांच्या आक्रोशाने सायबर चौकासह परिसरही गहिवरला.