Minor Girl Drowned Krishna River Udgaon Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Girl Drowned | "बाबा, मी वाचले... पण आमची कविता गेली,": उदगाव येथे कृष्णा नदीत बुडून १० वर्षीय मुलीचा मृत्यू

उदगाव येथील कृष्णा नदीत पोहताना दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

Minor Girl Drowned Krishna River Udgaon

जयसिंगपूर : उदगाव येथील कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन १० वर्षीय मुलींपैकी एकीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसऱ्या मुलीला स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे वाचविण्यात यश आले. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि.१०) सकाळी साडेसातच्या सुमारास उदगाव घाटावर घडली.

या दुर्घटनेत कविता विठ्ठल साळुंखे (वय १०, सध्या रा. शिरोळ रोड, उदगाव, मूळ रा. कालवाडी, ता. हुमनाबाद, जि. बिदर) हिचा मृत्यू झाला. तर प्रिया कालिदास चव्हाण (वय १०, रा. उदगाव) हिला नागरिकांनी वेळेत नदीतून बाहेर काढून जीवदान दिले.

पोहण्यासाठी उतरल्या अन् दुर्घटना घडली

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी बापू शंकर चव्हाण हे नेहमीप्रमाणे कृष्णा नदीवर पोहण्यासाठी गेले होते. ते घाटावर असतानाच प्रिया आणि कविता या दोघीही नदीत उतरल्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्या खोल पाण्यात गेल्या आणि बुडू लागल्या.

हा प्रकार लक्षात येताच बापू चव्हाण आणि घाटावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता नदीत उडी घेतली. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून प्रिया हिला सुखरूप बाहेर काढले. मात्र, कविता पाण्यात बेपत्ता झाली.

शोधानंतर मृतदेह सापडला

नदीतून बाहेर आल्यानंतर प्रियाने, "बाबा, मी वाचले... पण आमची कविता गेली," असे सांगत हंबरडा फोडला. त्यानंतर नागरिकांनी पुन्हा नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली. काही वेळानंतर कविताचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

कविताचे आई-वडील हयात नसल्याने तिचा सांभाळ मामा शंकर चव्हाण करत होते. लहान वयातच तिचा झालेला दुर्दैवी मृत्यू चव्हाण कुटुंबासाठी मोठा धक्का ठरला असून, या घटनेमुळे उदगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT