Kolhapur | जिल्‍ह्यात फार्म हाऊसचा बाजार... कुठे कुंटणखाना, कुठे डान्स बार

जुगार, बेटिंगलाही ऊत; बहुतांश ठिकाणी राजरोसपणे काळे धंदे : पोलिस प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष
Kolhapur |
Kolhapur | जिल्‍ह्यात फार्म हाऊसचा बाजार... कुठे कुंटणखाना, कुठे डान्स बार
Published on
Updated on

आशिष आडिवरेकर

कोल्‍हापूर : धावपळीच्या जीवनात निवांतपणासाठी फार्म हाऊसचा ट्रेंड समोर आला. मागणी वाढली तशी फार्म हाऊसची संख्‍याही वाढली. मात्र आडमार्ग आणि निर्जन ठिकाणामुळे या ठिकाणी राजरोसपणे काळे धंदे सुरू झाले. तामगाव येथील कारवाईनंतर फार्म हाऊसमधील कारनामे पुन्हा उ‍घड झाले आहेत.

वेश्या व्यवसाय, बेटिंग, तीन पानी जुगारसह डान्स बार चालणाऱ्या अनेक फार्म हाऊसकडे पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. लॉज, फार्म हाऊसवर असे व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी एक दरपत्रकच लागू केले आहे. शहराच्या नजीक असलेल्या करवीर, कळंबा, दिंडनेर्ली, इस्पुर्ली, हणबरवाडीसह जिल्ह्याच्‍या अनेक भागात अशा फार्म हाऊसची चलती आहे. बुधवारी रात्री झालेल्या कारवाईच्या मुळाशी गेल्यावरच पोलिस खात्यातील शुक्राचार्य समोर येण्याची शक्यता व्‍यक्‍त होत आहे.

अनेक फार्म हाऊस बनले लॉजिंग

शहरासह जिल्ह्यात फार्म हाऊसची संख्या वाढली आहे. यामुळे निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे काही फार्म हाऊस अवैध व्यवसायांकडे वळले आहेत. झटपट पैसे कमवण्याच्या नादात चालकांनी तीनपानी जुगार, बेटिंग, वेश्या व्यवसाय, स्पा सेंटरसह डान्स बारसाठी भाडे तत्त्वावर दिल्याचे समोर आले आहे. प्रेमी युगुलांना आता लॉजपेक्षा फार्म हाऊस सुरक्षित वाटत आहेत. यामुळे काही फार्म हाऊस चालकांनी कपल्ससाठी खास व्यवस्था केल्याचे दिसत आहे. त्यांच्यासाठी पॅकेजही बनविण्यात आले आहेत.

यापूर्वी झालेल्या कारवाया

२०१९ : आंबा येथील फार्म हाऊसच्या डान्स पार्टीवर थेट उपअधीक्षकांच्या पथकाचा छापा

२०२१ : पन्हाळ्याच्‍या पायथ्याशी फार्म हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय उघड

२०२१ : वाघबीळ येथील फार्म हाऊसच्या जुगार अड्ड्यावर कारवाई

२०२५ : कात्यायनी रोडवरील फार्म हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय

२०२५ : कुंभोज येथील फार्म हाऊसवर कुख्यात गुंडाचा आश्रय

पोलिसानेच थाटले दिंडनेर्ली परिसरात फार्म हाऊस

पोलिस प्रशासनातील एका कर्मचाऱ्यानेच दिंडनेर्ली परिसरात आलिशान फार्म हाऊस थाटले आहे. या ठिकाणी सर्रास डान्स बार भरवला जातो. १२ तासांसाठी १५ ते २० हजार रुपये घेतले जातात. पोलिस कर्मचाऱ्याचेच फार्म हाऊस असल्याने कारवाईची भीती नसल्याची भावना येथे येणाऱ्यांमध्ये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news