चंदगड : महाराष्ट्र-कर्नाटक हद्दीवरील शिनोळी खुर्द (ता. चंदगड) येथे एका घरावर दरोडा टाकून दागिने तसेच रोख रकमेसह 13 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांनी वृद्ध दांपत्यासह त्यांच्या मुलीवर चाकूने हल्ला करत दहशत निर्माण केली.
सदर घटना 29 नोव्हेंबर रोजी पहाटे 2 वाजता घडली असून मंगळवार दि. 9 डिसेंबर रोजी या घटनेची पोलिसात नोंद झाली आहे. चारहून अधिक दरोडेखोर असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला आहे. घटनास्थळी श्वानपथक, फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने पाहणी केली. देवरवाडी रस्त्यावर सदर एकच घर असल्याचा दरोडेखोरांनी फायदा घेतला.
या घटनेत निवृत्त प्रा. मनोहर लक्ष्मण मुतकेकर (वय 93) त्यांच्या पत्नी मंजुळा मुतकेकर (वय 86), कन्या भारती मधुकर फाळके (वय 65) हे तिघे जखमी झाले. चाकूने केलेल्या हल्ल्यात भारती आणि मंजुळा जखमी झाल्या आहेत. मनोहर यांना काठीने मारहाण करण्यात आली. घराच्या मागील दरवाजाची कडी उचकटून दरोडेखोर घरात शिरले. त्यानंतर थेट चाकूने त्यांच्यावर हल्ला करत दहशत निर्माण केली. दरोडेखोरांनी भारती व मंजुळा या दोघींचे 12 लाख 95 हजारांचे 185 ग्रॅमचे सोन्याचे दागिने, 4 हजार रुपये व 8 हजारांचे किमती साहित्य असा ऐवज लंपास केला. सदर दरोडा पडल्यानंतर आतापर्यंत कोल्हापूर येथील फॉरेन्सिक लॅब, श्वानपथक यांच्या माध्यमातून चंदगड पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फतही तपास गतीने सुरू आहे. यातील तिघे दरोडेखोर मराठी बोलत होते. या घटनेमुळे चंदगडसह सीमाभागात खळबळ उडाली आहे.