

कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीत बुधवारी (दि. 26) सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास रक्षाविसर्जनाला उशिरा का आला? अशी विचारणा केल्यावरून नातेवाईकांतच तुंबळ हाणामारी झाली. अंत्यसंस्कारासाठी वापरलेल्या तिरडीच्या काठ्यांनी एकमेकांची डोकी फोडण्यात आली. घटनेत चारजण जखमी झाले. यामुळे स्मशानभूमीत प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
विकास रामचंद्र गेजगे (वय 55) निवास रामचंद्र गेजगे (50), सुनंदा दगडू पारसे (65), पूजा दगडू पारसे (35, सर्व रा. इचलकरंजी) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मृताच्या नणंदेच्या व जावेच्या मुलांनी मारहाण केल्याचे गेजगे यांनी सांगितले.
गेजगे यांची बहीण अलका बाळू करडे (60, रा. जरगनगर) यांचे 25 नोव्हेंबरला सायंकाळी निधन झाले. मंगळवारीच त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी रक्षाविसर्जन होते. सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास इचलकरंजीहून त्यांचे भाऊ व इतर नातेवाईक आले. त्यावेळी मृत अलका करडे यांच्या नणंदेची मुले व इतरांनी त्यांना रक्षाविसर्जनाला वेळेत का आला नाही? असे म्हणत काठ्यांनी मारहाण केली. दोन्ही बाजूंकडून हाणामारी सुरू झाल्याने स्मशानभूमीत पळापळ झाली. अखेर काही नागरिकांनी त्यांच्यात मध्यस्थी करून शांत केले. दरम्यान, निवास गेजगे यांनी वैभव राजू पाटील, शुभम पाटील, नीलेश करडे, रेश्मा दत्ता भजनावळे आदींनी मारहाण केल्याचे पत्रकारांना लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात सांगितले.