Kolhapur crime news
बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील शिराळे-वारुण येथील मुख्य गल्लीत असलेल्या बंद घराचे कुलूप आणि कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत शाहूवाडी पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, वनिता दत्तात्रय शेडगे यांचे गावातील मुख्य गल्लीत घर आहे. गणेशोत्सव साजरा केल्यानंतर त्या २३ सप्टेंबर २०२६ रोजी कुटुंबीयांसह मुंबईला गेल्या होत्या. त्यानंतर त्यांचे घर बंद होते. दरम्यान, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्या घरी परतल्या असता, घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप आणि कडी-कोयंडा तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घरात जाऊन पाहणी केली असता, आतील खोल्यांमधील साहित्य विस्कटलेले दिसले. तसेच, लाकडी कपाट उघडून त्यातील साहित्य अस्ताव्यस्त केले होते. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ठेवलेली लोखंडी तिजोरी उघडून त्यातील ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चोरट्यांनी सोन्याच्या तीन अंगठ्या, सोन्याच्या कानातील रिंग व कुड्या, चांदीची नाणी, चांदीची बिस्किटे, चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ५ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी वनिता शेडगे यांनी ११ नोव्हेंबर रोजी शाहूवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, पोलीस उपनिरीक्षक अतुल सोनुने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. यावेळी कोल्हापूर फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते.
गावातील घरमालक बाहेरगावी गेल्यानंतर बंद घरांना लक्ष्य करून चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण आहे. चोरीचा तपास करून चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान शाहूवाडी पोलिसांसमोर आहे.