

दिलीप भिसे
कोल्हापूर : पोलिस दलासह विविध खात्यांतर्गत विशेष पथकातील अधिकारी, कर्मचारी असल्याचा बहाणा करून महामार्गासह ग्रामीण भागात निर्जन ठिकाणी दुचाकीस्वारांना एकाकी गाठून खुलेआम लुटण्याचा सराईत टोळ्यांचा जिल्ह्यात फंडा सुरू झाल्याने वाहनधारकांत चिंतेचे सावट आहे. अलीकडच्या काळात लूटमारीच्या अनेक घटना घडल्या; मात्र सराईत गुन्हेगारांना अद्यापही छडा लागला नाही.
शिरोळ-कुरूंदवाड रोडवर नृसिंहवाडीजवळ जयसिंगपूर येथील अमृत खबाले (वय ६५, रा. संभाजीनगर) यांना दोन भामट्यांनी रस्त्यात रोखले. एक्साईज अधिकारी असल्याचा त्यांनी बहाणा केला. आपली तपासणी करायची आहे, असे सांगून त्यांच्याकडील तीन लाख रुपये किमतीचे दागिने काढून घेत पोबारा केला. भरदिवसा ही घटना घडली. याप्रकरणी कुरूंदवाड पोलिस ठाण्यात अनोळखी भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटना घडून तीन-चार दिवसांचा कालावधी होऊनही पोलिसांना संशयिताचा छडा लागला नाही.
अलीकडच्या काळात कोल्हापूर-कागल रोडवर लक्ष्मी टेकडी, हातकणंगले-निमशिरगाव रोडवर मजले खिंड, शिरोळ बायपास रोडवर चौडेंश्वरी सूतगिरणीजवळील सर्कल, कोल्हापूर येथील राजाराम तलाव, शिवाजी विद्यापीठ परिसरासह पुणे-बंगळूर महामार्गावर निर्जन ठिकाणी वाहनधारकांना वाटेत अडवून त्यांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत. साधारणत: रात्री उशिरापर्यंत गुन्हेगारांची दहशत असते.
महामार्गासह ग्रामीण भागात रात्रीच्या अंधारात निर्जन रस्त्यावर सराईत गुन्हेगारांचा वावर असतो. दुचाकीस्वाराचा पाठलाग करून संबंधितांची वाहने रोखली जातात. अधिकारी असल्याचा बनाव करून प्रसंगी मारहाण करून दुचाकीस्वारांना लुटले जाते. वाटमारीचे प्रकार रोखण्यासाठी महामार्गासह ग्रामीण भागात रात्रीच्या गस्तीची मागणी होत आहे. सीसीटीव्ही फुटेजद्वारे सराईत टोळ्यांचा पोलिसांनी छडा लावावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.