Electric Shock  (file photo)
कोल्हापूर

Kolhapur News | नदीकाठी तुटलेल्या विजेच्या तारांचा धक्का लागून दुभती म्हैस ठार; शेतकरी बचावला

सरवडेतील घटना; महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

Sarawade Buffalo Electrocuted

सरवडे : सरवडे येथे नदीकाठी मोटारपंपाला वीजपुरवठा करणारी विद्युत वाहिनी (ए.जी. लाईन) तुटून पडल्याने विजेचा धक्का बसून शेतकऱ्याची दुभती म्हैस मृत्युमुखी पडली. या दुर्घटनेत शेतकरी राजेंद्र पांडुरंग वाईंगडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सुदैवाने प्रसंगावधान राखल्याने त्यांचा जीव बचावला. मात्र, नदीकाठी तुटून पडलेल्या विद्युत तारांमुळे शेतकरी आणि जनावरांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

राजेंद्र वाईंगडे हे आपली म्हैस धुण्यासाठी नदीवर गेले होते. म्हैस नदीपलीकडे गेल्याने तेही तिच्या मागोमाग गेले. यावेळी नदीकाठावरील मोटारपंपाजवळ म्हैस अचानक कोसळल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. म्हैस नेमकी कशामुळे पडली, हे पाहण्यासाठी ते पुढे जात असतानाच मोटारपंपाला वीजपुरवठा करणारी ए.जी. लाईन तुटून जमिनीवर पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने म्हैस तडफडत असल्याचे पाहून त्यांनी सावधगिरी बाळगली. मात्र, विजेच्या धक्क्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर संबंधित वीज कर्मचाऱ्यांनी मृत म्हशीचा पंचनामा केल्याचे सांगण्यात आले. दुभत्या म्हशीच्या मृत्यूमुळे वाईंगडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दुभती जनावरे हे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन असते. अशा परिस्थितीत विद्युत वाहिनीच्या दुर्घटनेमुळे शेतकऱ्याला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

महावितरणच्या देखभाल-दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह

नदी, विहिरी आणि शेतातील मोटारपंपांच्या परिसरात शेतकरी नियमितपणे ये-जा करतात. पिकांना पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्रीही त्यांना शेतात जावे लागते. त्यामुळे या परिसरातील विद्युत वाहिन्या सुरक्षित उंचीवर आणि सुस्थितीत असणे आवश्यक आहे. मात्र, विद्युत वाहिनी तुटून नदीकाठी पडत असेल, तर हा प्रकार मानवी जीवितालाही धोका निर्माण करणारा आहे.

आज एका मुक्या जनावराचा बळी गेला; उद्या एखाद्या शेतकऱ्याचा किंवा नागरिकाचा जीव गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

महावितरणने नदीकाठच्या, विहिरींच्या तसेच शेतातील मोटारपंपांना जोडलेल्या विद्युत वाहिन्यांची तातडीने तपासणी करावी. जीर्ण आणि धोकादायक तारा बदलून आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षित खांब व संरक्षक यंत्रणा उभारावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी शेतात जाताना जीव धोक्यात घालण्याची वेळ येऊ नये, यासाठी महावितरणने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT