

कोल्हापूर : जुना वाशीनाका परिसरातील एडका हल्लाप्रकरणी दोघांना तर निर्माण चौक परिसरातील मैलखड्डा येथील तोडफोडप्रकरणी सहा जणांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. मंगळवारी दिवसभरात संशयितांची धरपकड करून त्यांना बुधवारी सकाळी न्यायालयात हजर केले.
मैलखड्डा तोडफोडप्रकरणी आदित्य गणेश गुरव, सुजल उत्तम शिंदे, सक्षम विजय गुरव, आदिल आसिफ बागवान, वरुण विशाल थोरात, सार्थक संजय गोरे यांना अटक करण्यात आली आहे. एडका हल्ल्यातील संशयित साहिल सतीश कांबळे (वय २१, रा. गंजीमाळ परिसर) व निखील शशिकांत सुतार (२२, रा. निर्माण चौक) यांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादातून वैभव कांबळे याच्यावर साहिल कांबळे व निखिल सुतार यांनी सोमवारी सायंकाळी वाशीनाका परिसरात एडका हल्ला केला होता.
या रागातून रात्री उशिरा आदित्य गुरवसह दहा संशयितांनी निर्माण चौकातील मैलखड्डा परिसरात चार मोटारी, पाच दुचाकी व रिक्षांची टोळक्याने तोडफोड केली. पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांच्यासह पथकाने सर्व संशयितांची धरपकड सुरू केली होती. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले.