

कोल्हापूर : उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करावी या मागणीसाठी मंगळवारपासून न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी विविध संघटनांनी पाठिंबा दिला. जिल्ह्यातील जवळपास ९०० कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे याचा थेट परिणाम न्यायालयीन कामकाजावर झाला.
कसबा बावडा येथील जिल्हा व सत्र न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांसमोर मंगळवारी सकाळपासून आंदोलनास प्रारंभ झाला. मंगळवारी सकाळी वकील संघटनांनी आंदोलनस्थळी भेट देऊन संपाला पाठिंबा दिला. बेलिफ, शिपाई, लिपिक यांच्यासह ९०० कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे मंगळवारी आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी कामकाजावर परिणाम जाणवला.
संपाला बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवाचे सदस्य विवेक घाटगे, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र मंडलिक, माजी अध्यक्ष शिवाजीराव राणे, अजित मोहिते, गिरीश खडके, अभिजित कापसे, प्रशांत पाटील, बाबा नेरले, बी. आर. पाटील, रवींद्र जानकर, कॉमन मॅन संघटनेचे बाबा इंदुलकर यांच्यासह वकिलांनी पाठिंबा दिला.
जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना गट ‘क’ चे अध्यक्ष महेश पाटील, जिल्हा बेलीफ संघटनेचे अध्यक्ष अन्वर पठाण, जिल्हा स्टेनोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षा शीला काशीद, जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना गट ‘ड’ चे अध्यक्ष बाबासाहेब तांबे, शिवाजीराव वाडकर, नेहा सावंत, सविता राजकर, अपर्णा कागले यांच्यासह सर्व संघटनांचे पदाधिकारी व स्टेनोग्राफर, लिपिक, बेलिफ, शिपाई सहभागी झाले.