महसूल सहाय्यक मारुती मकर Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Accident | बांबवडेजवळ एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; महसूल सहाय्यकाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले जखमी

कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील हॉटेल टर्निंग पॉइंटजवळ अपघात

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur Bambavade ST Bus Bike Collision

बांबवडे : कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील हॉटेल टर्निंग पॉइंटजवळ एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या भीषण अपघातात शाहूवाडी तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक मारुती विठ्ठल मकर (वय ३६) यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी व दोन मुले जखमी झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती मकर हे दुचाकी (क्र. एमएच-०९-एफयू-५०४०) वरून पत्नी काजल, मुलगी सई आणि मुलगा समर्थ यांना उपचारासाठी बांबवडे येथे घेऊन जात होते. दरम्यान, बांबवडेजवळील हॉटेल टर्निंग पॉइंटच्या वळणावर कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणारी शिवाई एसटी बस (क्र. एमएच-१२-झेड-९५३४) आणि त्यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.

अपघातात मारुती मकर आणि मुलगी सई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर पत्नी काजल आणि मुलगा समर्थ हेही जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले. मात्र, उपचारासाठी नेत असतानाच मारुती मकर यांचा मृत्यू झाला. उर्वरित तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मारुती मकर हे अत्यंत शांत, मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून शाहूवाडी तहसील कार्यालयात परिचित होते. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील दहिगाव हे त्यांचे मूळ गाव असून, गेल्या चार वर्षांपासून ते शाहूवाडी तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांनंतर त्यांची बदली होणार होती.

या प्रकरणी एसटी चालक किरण अशोक हेगडे (वय ३७, रा. सांगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर) याला शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. मारुती मकर यांच्या आकस्मिक निधनाने शाहूवाडी तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT