

Murgud Nipani Road Car Accident
मुरगूड : मुरगूड -निपाणी मार्गावर खडकेवाडा पुलावर भरधाव कारने पती पत्नीला उडवले. यात पती बाळासो तासिलदार ( वय ६५ रा. खडकेवाडा ता. कागल ) व गाडीचालक वासीम मोहम्मद सोलापूरे (वय ४५, रा. निपाणी ) हे दोघे जागीच ठार झाले. तर अन्य दोघेजण जखमी झाले. हा अपघात सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास झाला. अपघाताची मुरगूड पोलिसांत नोंद झाली आहे.
अपघातासंबंधी अधिक माहिती अशी : सोमवारी रात्री खडकेवाडा ( ता . कागल ) येथील दाम्पत्य बाळासो बाबालाल तासिलदार वय ६५ ) व सुगराबी बाळासो तासिलादार (वय ५८ ) हे दोघे रात्री घरातील मोहरमचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री उशीरा गलगले रस्त्यावरील आपल्या शेतातील घराकडे झोपण्यासाठी जात होते. दरम्यान, मुरगूड - निपाणी मार्गावर खडकेवाडा पुलावरून निपाणीकडे जाणाऱ्या भरधाव कारने ( एमएच ०३ ) दाम्पत्यास पाठीमागून जोराची धडक दिली.
यात बाळासो हे २० फूटावर जावून पडल्याने ते गंभीर जखमी होवून जागीच ठार झाले. तर गाडी पलटी होऊन झाडाला जावून धडकली. यात कार चालक वासीम मोहम्मद सोलापूरे (वय ४५ रा. निपाणी ) हे जागीच ठार झाले. या अपघातातील सुगराबी बाळू तासिलदार व गाडीतील अमिर आजम गवंडी ( वय ४० रा.निपाणी ) असे दोघेजण जखमी झाले. जखमींना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले .
अपघातस्थळावरील दृश्य अंगावर शहारे आणणारे होते . बाळासो तासिलदार यांचा एक हात व एक पाय धडापासून दहा ते बारा फूटाच्या अंतरावर पडला होता. तर जागेवर रक्ताचा सडा पडला होता. भरधाव कारवरील बेधुंद चालकाचा ताबा सुटल्यानेच हा थरारक अपघात झाला.
अपघाताची माहिती पोलीस पाटील आप्पा पवार यांना मिळताच त्यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना रूग्णालयात दाखल केले. मुरगूड पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे.