Dr Amit Patil Snake Research in Kolhapur
कोल्हापूर : २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत साजऱ्या केल्या जाणाऱ्या वन्यजीव सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर एक उत्साहवर्धक बातमी आली आहे. सर्प अभ्यासक आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. अमित पाटील यांना सप्टेंबर महिन्यात गगनबावडा परिसरात अतिदुर्मीळ समजल्या जाणाऱ्या ‘ब्लॅक किंवा स्ट्राईप्ड कोरल स्नेक’च्या ‘खंडालेन्सिस’ या रंगभिन्नता असणारी प्रजाती आढळली. याच प्रजातीतील दोन साप त्यांना या भागात मृतावस्थेत आढळले आहेत. यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातून ‘कॅस्टोचा कोरल स्नेक’ या प्रजातीची नोंद झाली आहे. मात्र आत्ता डॉ. पाटील यांना आढळलेले हे साप त्याहून भिन्न प्रजातीतील आहेत. हे साप रस्ते अपघातात मृत झालेले आहेत.
डॉ. अमित पाटील यांनी या सापांची विविध प्रोफाईल्समधून छायाचित्रे घेऊन काही ऑनलाईन संदर्भ शोधले. शिवाय, प्रसिद्ध सर्पतज्ज्ञ डॉ. वरद गिरी यांचेही त्यांनी हा साप ओळखण्याच्या कामी मार्गदर्शन घेतले आहे. अभ्यासांती ही ‘ब्लॅक कोरल स्नेक’मधील ‘खंडालेन्सिस’ (Calliophis nigrescens khanallensis) ही नायग्रेसन्स प्रजातीचीच रंगभिन्न प्रजाती असल्याचे समजले आहे. पश्चिम घाटातील काही ठराविकच ठिकाणी यापूर्वी ही प्रजाती आढळून आली असली तरी, डॉ. पाटील यांनी शोधलेल्या संदर्भांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात या प्रजातीची अधिकृत नोंद झाल्याचे दिसून आले नाही. शिवाय, महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वी महाराष्ट्रातूनही या प्रजातीच्या सापांची अत्यंत तुरळकच नोंद झाली आहे. १९१३ साली प्रसिद्ध सर्पतज्ज्ञ वॉल यांना खंडाळा येथे पहिल्यांदा ही वेगळी प्रजाती आढळल्याची नोंद आहे. यावरूनच या प्रजातीला ‘खंडालेन्सिस’ हे नाव मिळाले आहे.
कॅलिओफिस नायग्रेसन्स प्रजातीतील हे साप विषारी असून एलॅपिडी (Elapidae) कुळातील आहे आणि ते अंडी घालतात. त्यांची कमाल लांबी सुमारे ११४ सेंटिमीटरपर्यंत असते. त्याचे शरीर बारीक व दंडगोलाकार असून शेपटीचे टोक बोथट असते. या सापाच्या पाठीचा रंग गडद निळसर काळा, राखाडी काळा किंवा जांभळट तपकिरी असतो. काही सापांच्या पाठीवर रेषा किंवा ठिपके दिसतात, तर काही जवळजवळ एकसंध काळे असतात.
या सापाची पोटाची बाजू चमकदार लाल किंवा केशरी असते आणि हीच त्याला ओळखण्याची सर्वांत ठळक ओळख आहे. याचे डोके काळे असून ओठांवर आणि मानेवर पांढरट ठिपके दिसतात. शरीराच्या मध्यभागी खवल्यांच्या १३ ओळी असतात. या सापांच्या शेपटीची खालची बाजू पांढरट असून त्यावर लाल त्रिकोणी ठिपके असतात, जे कंगव्यासारखे दिसतात. हा साप लाजाळू स्वभावाचा असून पावसाळ्यात दमट जागी गुप्तपणे कुजणाऱ्या पानांच्या थराखाली आणि ओढ्यांच्या काठी आढळतो. तो प्रामुख्याने इतर लहान सापांवर उपजीविका करतो. खापरखवल्या प्रजातीचे साप हे त्याचे मुख्य अन्न असते.
या प्रजातीचा 'खंडालेन्सिस' (khandallensis) हा रंगभिन्न प्रकार आहे. त्याचे वर्णन १९१३ मध्ये वॉल यांनी खंडाळा परिसरातून केले. या प्रकारात पाठीवरचे पट्टे अस्पष्ट किंवा जवळजवळ नसतात आणि साप निळसर किंवा हिरवट काळा, एकसंध दिसतो. नायग्रेसन्स आणि खंडालेन्सिस या दोन्हींमधील फरक रंगापुरताच मानला जातो. उपलब्ध माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातून या सापाची प्रकाशित नोंद झाल्याचे आढळले नाही.
या सापाच्या विषाचा स्वतंत्र शास्त्रीय अभ्यास आजवर प्रकाशित झालेला नाही, त्यामुळे त्याची नेमकी तीव्रता (LD50) माहीत नाही. कॅलिओफिस वंशातील इतर प्रजातींच्या विषात प्रामुख्याने मज्जासंस्थेवर परिणाम करणारी विषद्रव्ये (न्यूरोटॉक्सिन) असतात, पण त्यांची तीव्रता प्रजातीनुसार खूप बदलते. अर्थात, हे साप लाजाळू असल्याने या वंशाच्या सापांचे दंश अत्यंत क्वचित होतात आणि चावल्यास सुरुवातीला वेदना किंवा सूज फारशी येत नसल्याने धोका लक्षात येत नाही. या प्रजातीसाठीचे खास प्रतिविष (अँटिव्हेनम) उपलब्ध नसल्यामुळे या सापाला हाताळू नये आणि दंश झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत. या सापाचे विष हा विभागीय विषशास्त्रीय अभ्यासाचा नवा विषय ठरू शकतो.
जगभरात एकूण ३६ जैवविविधता हॉटस्पॉट्स असून भारतात त्यांपैकी ४ हॉटस्पॉट्स भारतात आहेत. त्यांपैकीच एक असणाऱ्या पश्चिम घाटांमधील समृद्ध जैवविविधता या सापाच्या अस्तित्वाने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.- डॉ. अमित पाटील, निसर्गप्रेमी व सर्प-अभ्यासक