

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. धार्मिक तीर्थस्थळे, क्रीडा, व्यापार, उद्योग यांची गौरवी परंपराही आहे. कोल्हापूरचे समग्र, एकात्मिक ब्रँडिंग करण्यासाठी ‘कोल्हापूर महोत्सव’सारखे उपक्रम राबवावेत, अशी सूचना राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांचे सादरीकरण राज्यपाल वर्मा यांना करण्यात आले. वर्मा मंगळवारी एक दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले. त्यांनी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. शासकीय विश्रामगृहावर जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत राज्यपाल वर्मा यांनी जिल्हा परिषदेच्या पिंक रूम उपक्रमाचे कौतुक करून याची गरज व महत्त्व अधोरेखित केले. तसेच, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात उभी करण्यात आलेली ट्रान्सजेंडर यांची रेस्क्यू टीम या संकल्पनेचेही राज्यपाल महोदयांनी कौतुक केले.