Radhanagari Kagal Drone Sighting Night AI Photo
कोल्हापूर

Kolhapur Drone Sighting | ड्रोनच्या रात्रीच्या घिरट्यांमुळे बोरवडे–मालवे परिसरात खळबळ

शक्तीपीठ महामार्गासाठी ड्रोन सर्व्हे सुरू असल्याचा ग्रामस्थांचा संशय

पुढारी वृत्तसेवा

Radhanagari Kagal Drone Sighting Night
आशिष पाटील

गुडाळ : राधानगरी तालुक्यातील तळाशी, तुरंबे, मालवे तसेच कागल तालुक्यातील बोरवडे परिसरात गुरुवारी (दि.११) रात्री ९ ते ११.३० या वेळेत चार ड्रोन आकाशात घिरट्या घालत असल्याचे आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. या परिसरातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जाणार असल्याने संबंधित मार्गाच्या सर्व्हेसाठीच ड्रोनचा वापर केला जात असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

महामार्गाला स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांचा तीव्र विरोध असताना त्यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून ही कार्यवाही सुरू असल्याची भावना व्यक्त होत असून याबाबत संतापही वाढत आहे.

मालवेचे उपसरपंच जयसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला मालवे व बोरवडे येथील शेतकरी आणि ग्रामस्थांचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. गुरुवारी रात्री या विषयावर दोन्ही गावांतील तरुणांची बैठक सुरू असतानाच महामार्गाच्या संभाव्य मार्ग परिसरात ड्रोन फिरत असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर दोन्ही गावांतील सुमारे पन्नासहून अधिक तरुणांनी ड्रोनच्या दिशेने जाऊन पाहणी केली असता, चार ड्रोन उंचावरून परिसरात घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले. तळाशीकडून आलेले हे ड्रोन मालवे–बोरवडे परिसरातून उंदरवाडी पठाराच्या दिशेने पुढे जात भुदरगड तालुक्यातील नाधवडे व कोनवडे गावांच्या दिशेने गेल्याचे तरुणांनी सांगितले.

या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून ड्रोन उड्डाणामागील नेमके कारण काय, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT