Radhanagari Dam Water Shortage
कौलव : संपूर्ण राज्यात पाणीदार तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सुमारे ४० टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेल्या राधानगरी तालुक्यावर यंदा दुष्काळाचे गंभीर संकट ओढवले आहे. जून महिना निम्मा संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने धरण क्षेत्रात केवळ ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे तुळशी धरण क्षेत्रात अद्याप पावसाचा थेंबही पडलेला नाही. परिणामी तालुक्यातील तिन्ही प्रमुख धरणांमध्ये मिळून अवघा ५.८४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
गतवर्षी याच दिवशी धरण क्षेत्रात ७५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती, तर धरणांमध्ये १२.२२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असून बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
राधानगरी तालुका हा राज्यातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या भागांपैकी एक मानला जातो. तालुक्यात काळम्मावाडी (२८ टीएमसी), राधानगरी (८.३६ टीएमसी) आणि तुळशी (३.५० टीएमसी) ही प्रमुख धरणे असून लघुप्रकल्पांमधूनही सुमारे चार टीएमसी पाणी साठवले जाते. तालुक्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान सुमारे साडेपाच हजार मिलिमीटर आहे. या जलस्रोतांवर तीन औद्योगिक वसाहतींसह जिल्ह्याचा मोठा भाग अवलंबून आहे. मात्र यंदा हाच पाणीदार तालुका पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.
मृग नक्षत्र जवळपास कोरडेच गेल्याने शेतीचे नियोजन विस्कळीत झाले आहे. तालुक्यात सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची धुळवाफ पेरणी झाली असली तरी उर्वरित सुमारे अकरा हजार हेक्टरवरील पेरण्या रखडल्या आहेत. पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात भात रोपवाटिका तयार केल्या जातात; मात्र पावसाअभावी रोपे तयार करण्याचे कामही ठप्प झाले आहे. धुळवाफ पेरणी केलेले भात पीक पाण्याअभावी करपू लागले असून ऊस पिकालाही फटका बसत आहे.
अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून नदीपात्रात जेसीबीच्या सहाय्याने चर खोदून पाणी उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या वर्षी १६ जूनपर्यंत राधानगरी धरणात ४.५७ टीएमसी पाणीसाठा होता. सध्या हा साठा केवळ २.१४ टीएमसीवर आला आहे. गतवर्षी धरण क्षेत्रात २८६ मिलिमीटर पाऊस झाला होता, तर यंदा अवघ्या ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
काळम्मावाडी धरणात गतवर्षी ५.८३ टीएमसी पाणीसाठा होता. यंदा तो केवळ २.३३ टीएमसी इतकाच आहे. धरण क्षेत्रात गेल्या वर्षी २४१ मिलिमीटर पाऊस झाला होता, तर यंदा फक्त ३३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
तुळशी धरणात गतवर्षी १.८२ टीएमसी पाणीसाठा होता. सध्या तो १.४७ टीएमसी इतका आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी २३० मिलिमीटर पाऊस झालेल्या या धरण क्षेत्रात यंदा अद्याप एक मिलिमीटरही पाऊस झालेला नाही. अशी परिस्थिती प्रथमच उद्भवल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.