कोल्हापूर

कोल्हापूर: वाठारच्या माजी ग्रा.पं.सदस्या पुष्पांजली क्षीरसागर यांचे अपघातात निधन

अविनाश सुतार

किणी, पुढारी वृत्तसेवा : अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत वाठारच्या माजी ग्रामपंचायत सदस्या पुष्पांजली संजय क्षीरसागर (वय ४८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती संजय क्षीरसागर जखमी झाले. ही घटना पुणे- बेंगलोर महामार्गावर घुणकी पुलाच्या वळणाजवळ आज (दि. २४) दुपारी बाराच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाठार येथील संजय क्षीरसागर पत्नी पुष्पांजली यांच्यासह बहादूरवाडी (ता. वाळवा, जि.सांगली) येथे नातेवाईकाच्या रक्षा विसर्जनासाठी दुचाकीवरून निघाले होते. वारणा नदी पुलाच्या अलीकडे हराळे रिसॉर्टसमोर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात ट्रकने धडक दिली. या धडकेत संजय हे दुचाकीसह बाजूला पडले. तर पुष्पांजली ट्रकखाली चिरडल्यामुळे जागीच ठार झाल्या. अपघातानंतर संजय यांना रुग्णवाहिकेतून वडगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वाठारच्या माजी ग्रामपंचायत सदस्या व शिवशक्ती पतसंस्थेच्या संचालिका असणाऱ्या पुष्पांजली या सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या हातकणंगले तालुकाध्यक्षा म्हणून त्यांनी नुकतीच जबाबदारी घेतली होती. त्यांच्या मागे मुलगा व विवाहित मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने वाठार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT