कोल्हापूर

कोल्हापूर : पेठवडगाव येथे १७ एकरावर ५५०० वृक्षांची लागवड; महालक्ष्मी देवराईचा स्तुत्य उपक्रम

अविनाश सुतार


किणी: दरवर्षी पावसाळा आला की झाडे लावा…ची आरोळी सुरू होते. आणि पावसाळा संपताच त्यातील हवा निघून जाते. तेच खड्डे, तेच लोक पण नवीन झाडे अशा साखळीतून लाखो रुपये खड्डयात जातात. पण झाडांचे संगोपन होत नाही. मात्र, तब्बल १७ एकर माळावर वनराई फुलवण्याची किमया वडगावकरांनी करून दाखवली आहे.

पेठवडगाव ते तासगाव रोडलगत सामाजिक वनीकरणची जागा आहे. चार वर्षांपूर्वी येथे फिरायला येणाऱ्या योग फाउंडेशन, व्यापारी असोसिएशनच्या सदस्यांनी या ठिकाणी सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून लावलेल्या झाडांची मरणासन्न अवस्था पाहिली आणि या माळावर वनराई फुलविण्याचा चंग बांधला. योग फौंडेशन, व्यापारी असोसिएशन बरोबरच निसर्ग प्रेमी ग्रुप, पेठ वडगाव परिसरातील नागरिक, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, आर्ट ऑफ लिव्हिंग, छावा संघटना, ब्रह्माकुमारी संस्था यांनी पुढाकार घेतला. जागा स्वच्छ केली, खड्डे खणले आणि या १७ एकर जागेवर तब्बल ५ हजार ५०० खड्डयांमध्ये वड, पिंपळ, कडुलिंब, करंज, आवळा, कवठ, फणस, आंबा तसेच वावळ, हिरडा, बेहडा, कांचन, आपटा, सीता अशोक, बहावा, बेल, लिंबू, अर्जुन, ऐन, कडीपत्ता, मेडशिंगी, बारतोंडी, पळस, काटेसावर ही देशी वाणाची आणि औषधी वृक्षांची लागवड केली.

सदस्यांच्या वर्गणीतून पाणी साठविण्यासाठी टाक्या बांधल्या, शेततळी खोदली आणि दररोज सकाळी साडेसहा वाजता या वृक्षांची आंतरमशागत केली जाऊ लागली. चार वर्षानंतर आज तेथे वनराई फुलली आहे. महालक्ष्मी वनराई असे तिचे नामकरण करण्यात आले आहे. पावसाळा संपल्यानंतर त्या वृक्षांना देण्यासाठी पाण्याचा स्रोत नसल्याने टँकरने पाणी द्यावे लागते, याचा खर्चही हे सर्व लोक उचलतात. कुणाचा वाढदिवस असेल त्यांनी पाण्याचा टँकर देण्याबरोबरच एक देशी वाणाचे रोपटे लावायचे, असा उपक्रम त्या ठिकाणी अव्याहतपणे सुरू आहे. या उपक्रमातून देशी वृक्षांना दररोज पाणी घातले जाते. यामध्ये महालक्ष्मी देवराई ग्रुपमधील सदस्य न चुकता सेवा देतात. नगरपालिका, व्यापारी, नागरिक, शिक्षक, डॉक्टर्स, इंजिनीअर्स, राजकीय नेते, तासगाव ग्रामपंचायत, पोलिस दल तसेच वेगवेगळ्या भागातून पाण्याचा टँकर देऊन मदत करत आहेत.

या निसर्गसंवर्धनाच्या उपक्रमाने या ठिकाणची जैवविविधता वाढीस लागली आहे. येथे विविध जातीच्या पक्षांचाही चिवचिवाट अव्याहतपणे सुरू झाला आहे. काही दिवसांतच ही गर्द वनराई लोकांच्या पिकनिकचे ठिकाण बनू शकते. पण येथे पिकनिक स्पॉट न बनता सुरक्षित जैवविविधतेचा नमुना म्हणूनच याची ख्याती व्हावी, ही भावना महालक्ष्मी वनराईच्या सदस्यांनी आज जागतिक वनसंवर्धन दिनी 'दै.पुढारी'शी बोलताना व्यक्त केली.

१७ एकर खडकाळ माळ रानावर एक मोठे जंगल वसवून जैवविविधता तयार होत आहे. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. यासाठी आर्थिक मदतीपेक्षा वृक्षांचे संगोपन करण्याची सेवा देण्यासाठी समाजाने पुढे यावे.

– राहुल काळे, सदस्य 'महालक्ष्मी देवराई'

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT