नृसिंहवाडी : येथील मारुतीची प्राचीन मूर्ती व मंदिर Pudhari
कोल्हापूर

Hanuman Jayanti | १२० वर्षापूर्वी मुलीच्या स्मरणार्थ पित्याने उभारले मारुती मंदिर; कदम घराण्याची पाच पिढ्यांची सेवा; अनेक साधू संतांचा सहवास

दिवंगत मुलीच्या स्मरणार्थ उभारलेले हे मंदिर आजही भक्ती आणि वात्सल्याचा अनोखा संगम म्हणून ओळखले जाते

पुढारी वृत्तसेवा

120 year old temple Nrusinhawadi Kolhapur

दर्शन वडेर

नृसिंहवाडी : नृसिंहवाडी येथे दत्तभक्ती सोबत श्रद्धेची अनेक रूपे पाहायला मिळतात. अशाच श्रद्धास्थानांपैकी एक म्हणजे शिरोळ रस्त्यावर असलेले १२५ वर्षांहून अधिक प्राचीन 'मारुती मंदिर'. एका पित्याने आपल्या दिवंगत मुलीच्या स्मरणार्थ उभारलेले हे मंदिर आजही भक्ती आणि वात्सल्याचा अनोखा संगम म्हणून ओळखले जाते.

या मंदिराचा इतिहास अत्यंत भावूक आहे. नृसिंहवाडीतील कदम घराण्याची शेती शिरोळ मार्गावर आहे. या शेतात मारुतीरायाची एक अत्यंत प्राचीन मूर्ती होती, मात्र मंदिर छोटेखानी होते. शिरोळ येथील गंगाराम सायबू फुलमाळी यांना पार्वतीबाई नावाची मुलगी होती. गुढीपाडव्याच्या दिवशी तिचे अकाली निधन झाले. मुलीच्या निधनाचे दुःख बाजूला सारून गंगाराम फुलमाळी यांनी २६ जुलै १९०६ रोजी हे मंदिर उभे केले. आपल्या लाडक्या मुलीच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि तिच्या आत्म्याला शांती मिळावी, या हेतूने त्यांनी या दगडी मंदिराची उभारणी केली. एका सामान्य माळ्याने आपल्या कष्टाच्या कमाईतून मुलीच्या आठवणीत उभे केलेले हे मंदिर आजही श्रद्धेचे प्रतीक आहे.

हे मंदिर प्राचीन दगडी बांधणीचे असून, मंदिराचा परिसर अत्यंत शांत आणि प्रसन्न आहे. गाभाऱ्यात मारुतीची चार फूट उंच भव्य प्राचीन मूर्ती आहे. २००५, २०१९, २०२१ अशा महापुरातही मंदिर सुस्थितीत आहे. कदम कुटुंबीयांनी लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. काळाच्या ओघात अनेक बदल झाले तरी मंदिराचे पावित्र्य आणि कदम घराण्याने जपलेली परंपरा आजही अबाधित आहे.

सेवेकरी बाळू कदम हे गेल्या पाच पिढ्यांपासून या मंदिराची देखभाल आणि पूजाअर्चा अत्यंत निष्ठेने करत आहेत. या मंदिरात अनेक साधू संतांचा सहवास घडला आहे. कोणत्याही सरकारी किंवा संस्थात्मक मदतीची अपेक्षा न ठेवता, कदम कुटुंब स्वखर्चाने आणि श्रद्धेने या ऐतिहासिक वारशाचे जतन करत आहे.

ऊन-पावसात मंदिरच आधार

हे मारुती मंदिर नृसिंहवाडीची वेस म्हणून ओळखले जाते. यामुळे या मंदिराला अनेक लोक 'शिवेचा मारुती' असेही म्हणतात. 2022 साली राज्यमार्गाच्या बांधकामावेळी शिरोळ नृसिंहवाडी मार्गावरील अनेक वृक्षे तोडण्यात आली. संपूर्ण मार्गावर ऊन-पावसात निवाऱ्यासाठी कुठेच जागा नाही. यामुळे हे मारुती मंदिर वाहनधारक व वाटसरूंचा आधार बनलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT