

Latur Chakur Panyatil Maruti Hanmantwadi
संग्राम वाघमारे
चाकूर : तालुक्यातील हणमंतवाडी येथील श्री क्षेत्र ‘तीर्थ (पाण्यातील) हनुमान’मंदिर हे जागृत देवस्थान असून खाली डोके, वर पाय मूर्ती असणारा 'पाण्यातील मारुती', भक्ताच्या नवसाला पावणारा म्हणून पंचक्रोशीत ओळखला जातो. याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते.
चाकूरपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर हणमंतवाडी गावातील या देवस्थानाबाबत विशेष श्रद्धा असून कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी ‘तीर्थ हनुमानाचे दर्शन घेण्याची परंपरा आजही जपली जाते. या देवाच्या दर्शनाला भक्त महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्रप्रदेशातील सीमावर्ती भागातून मोठ्या भक्ती भावाने येत असतात. हनुमान जयंतीनिमित्त येथे दरवर्षी भव्य यात्रा भरते.
हजारो भाविक दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. वर्षभर प्रत्येक शनिवारी येथे महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दूरदूरवरून अनेक भक्त पायी चालत येऊन नवस फेडतात. या ठिकाणी महाप्रसादासाठी मोठी मागणी असून, महाप्रसादाची तारीख मिळण्यासाठी दीड ते दोन वर्षांची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे काही भक्त सोमवार व शुक्रवारीही महाप्रसादाचे आयोजन करतात. हनुमान जयंतीनिमित्त सप्ताहाचे आयोजन करून कीर्तन, भजन व विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय होतो.
या देवस्थानाची आख्यायिका विशेष महत्त्वाची मानली जाते. पूर्वी काही लोक हनुमान मूर्तीची शिळा बैलगाडीतून नेत असताना दोर तुटून शिळा या ठिकाणी पडली. नंतर कितीही प्रयत्न करूनही ती उचलता आली नाही. त्यामुळे "मूर्ती खाली डोके व वर पाय" अशा स्थितीत स्थिरावली. याच कारणामुळे येथे हनुमानाच्या पायाची पूजा केली जाते. तसेच मूर्तीखालून सतत पाणी वाहत असल्याने यास ‘तीर्थ हनुमान’ असे संबोधले जाते.
मंदिराच्या पाठीमागे प्राचीन पिंपळ वृक्ष असून या ठिकाणाचे धार्मिक महत्त्व अधिक वाढवतो. नवसाला पावणारा देव म्हणून याची सर्वत्र ख्याती आहे. देवस्थानाचे बांधकाम ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले असून सध्या या ठिकाणाचा ‘तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम’ अंतर्गत विकास व्हावा, अशी मागणी भाविकांतून होत आहे. भाविकांच्या सोयीसाठी भक्तनिवास, सिमेंट रस्ते, प्रसादालय, पिण्याच्या पाण्याची टाकी व पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी भाविकांनी केली आहे.
देवस्थानाच्या विकासासाठी ट्रस्टचे अध्यक्ष उत्तमकुमार वाघ, उपाध्यक्ष दिगंबर किसवे, सचिव हणमंत नरवटे यांच्यासह ग्रामस्थ व भाविक परिश्रम घेत आहेत. हनुमान जयंतीनिमित्त या पवित्र स्थळावर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.