राहुल सावंत
निपाणी : कोल्हापूर येथून विक्रीसाठी गांजाची तस्करी करणाऱ्या निपाणीतील दोघांवर कोल्हापूर वेस भुयारी मार्गाजवळ शहर पोलिसांनी कारवाई केली. यावेशी २३ हजार रुपये किंमतीचा गांजा व दुचाकी असा एकुण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
राहुल महांतेश सावंत (वय-२१ रा. आश्रमनगर निपाणी), जाफरसादिक नदीम बशीर पठाण (वय-२१ रा. तहसीलदार प्लॉट, निपाणी) अशी कारवाई केलेल्या दोघाची नावे आहेत. दरम्यान गांजा पुरवठा करणारा कोल्हापुर येथील सलीम (वय ३५) हा संशयित फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध चालविला आहे.
निपाणी कोल्हापूर रोड भुयारी मार्गाजवळ दोघेजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सीबीआय बी.एस.तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पुजारी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षिका एस.एस. नरसाप्पानावर, हवालदार संजय काडगौडर, उमेश माळगे, आर एस, ढंग, यासीन कलावंत, प्रभू सिद्धांतगीमठ यांनी राहुल सावंत व जाफर पठाण या दोघांना ताब्यात घेतले.
यावेळी दोघांकडे ४०० ग्रॅम गांजा मिळून आला. यावेळी दोघांची चौकशी केली असता त्यांनी आपण कोल्हापुर येथील सलीम यांच्याकडून विक्रीसाठी गांजा खरेदी केल्याचे सांगितले.त्यानुसार दोघांवर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये पुन्हा दाखल करून विक्रेता सलीम याचा शोध चालवला असल्याची माहिती उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांनी दिली.