

स्वप्निल पाटील
सांगली : सांगली जिल्ह्यात गांजा तस्करीचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत चालले आहे. परंतु त्याला आळा घालणे मात्र पोलिसांच्या हाताबाहेर जात असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही गांजाचा पुरवठा वाढला असून, विशेषतः सांगली आणि मिरज शहरात खुलेआम विक्री होत असल्याचे दिसून येते. तसेच तासगाव तालुक्यात तर चक्क गांजाची शेती करण्यात आली होती. तसेच जत तालुक्यातून गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात असल्याचेही समोर आले आहे.
जत तालुका हा गांजा लागवडीचे व तस्करीचे माहेरघर मानले जाते. त्यापाठोपाठ आता तासगाव तालुकाही गांजा तस्करीमध्ये व लागवडीमध्ये पुढे येत आहे. सांगली, मिरज शहरे व कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्येही गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे. दलाल आणि छोट्या-मोठ्या विक्रेत्यांमार्फत गांजाची तस्करी केली जात आहे. युवकांमध्ये वाढते व्यसन आणि सहज उपलब्ध होणारा गांजा यामुळे पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. सांगली आणि मिरज शहरातील काही संवेदनशील परिसरामध्ये रात्रीच्या वेळी गांजाची विक्री होत असल्याची चर्चा आहे. पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई केली जात असली तरी, तस्कर नवनवीन मार्गांचा वापर करून आपला व्यवसाय सुरू ठेवत असल्याचे दिसून येते. यापूर्वी गांजाची लागवड व तस्करी छुप्या पद्धतीने केली जात होती. परंतु आता ती उघडपणे होऊ लागल्याचे चित्र आहे. यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तासगाव तालुक्यातील खुजगावमधील एका पठ्ठ्याने तर चक्क द्राक्षबागेत गांजाची लागवड केली होती. झाडांची उंची चार ते पाच फूट झाल्यानंतर त्याचा सुगावा तासगाव पोलिसांना लागला. त्यानंतर कारवाई करण्यात आली. नजरेस पडेल अशा पद्धतीने गांजाची शेती होऊ लागल्याने गांजाबाबत पोलिसांनी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड व तस्करी केली जाते. परंतु तुरळक कारवाया सोडल्या, तर गांजा शेतीवर व तस्करीवर ठोस ‘ॲक्शन’ घेतल्याचे दिसून येत नाही. जतमधून दलालांमार्फत गांजा सांगली, मिरजेत येतो. या ठिकाणी दलालांमार्फत सर्रास गांजा विकला जात आहे. हे बहाद्दर वर्षानुवर्षे गांजा विकतात, त्यांची नावे पोलिसांच्या रेकॉर्डवर आहेत. परंतु त्यांच्यावर कारवाई मात्र का केली जात नाही?, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केला जात आहे.
गांजा तस्करीचा बीमोड करायचा असेल, तर पोलिसांनीच यासाठी एककलमी कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. गांजा तस्करांपासून ते गांजाची शेती करणार्यांवर कारवाईचा धडाका लावणे गरजेचे आहे. अवैध धंद्यांना खत-पाणी घालणार्यांचे कंबरडे मोडण्याची मागणी आता सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.
पन्नास रुपयात पुडी?
शहरात अवघ्या पन्नास रुपयांमध्ये गांजा मिळतो. तो कोठे मिळतो, याची चर्चा गावभर आहे. गांजा सहज उपलब्ध होत असल्याने नशेखोरांकडून त्याची सहजपणे खरेदी केली जाते. गांजाच्या सेवनाने धुंद झालेल्या अनेकांकडून गुन्हेगारी कारवाया केल्या जात आहेत. ५० रुपयांत गांजा मिळत असल्याने याचे पेव मोठ्या प्रमाणात फुटल्याचे दिसून येते.
गांजा ओढणार्यांवर कारवाई, तस्करांवर कधी?
सांगली, मिरज शहरात गांजा ओढणार्यांवर सातत्याने कारवाई केली जाते. गांजा सहजपणे मिळतो, म्हणून तो सार्वजनिक ठिकाणी सहजपणे ओढला जातो. गांजा ओढणार्यांकडे शून्य रुपयांपासून दहा रुपयांपर्यंत गांजा मिळाला, असा गुन्हा दाखल होतो. गांजा ओढणार्यांवर जशी कारवाई केली जाते, तशी तस्करांवरही करणे गरजेचे आहे.