शिरढोण : शिरढोण (ता. शिरोळ) येथे घरगुती वीज मीटर पोलवर बसविण्याच्या महावितरणच्या प्रयत्नाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत काम थांबविण्यास भाग पाडले. कोणतीही पूर्वकल्पना न देता गावात दाखल झालेल्या महावितरणच्या कर्मचारी व ठेकेदारांना ग्रामस्थांनी एकत्र येत परत पाठवले.
या वेळी महावितरणच्या कनिष्ठ अभियंता वर्षा शहाणे यांना ग्रामस्थांनी धारेवर धरत जाब विचारला. ग्राहकांना कोणतीही माहिती न देता थेट मीटर पोलवर बसविण्याचा निर्णय कसा घेण्यात आला, असा सवाल उपस्थित करण्यात आला. अचानकपणे राबविण्यात येणाऱ्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मागासवर्गीय समाजामध्येच मोठ्या प्रमाणावर स्मार्ट मीटर बसविले जात असून हा अन्यायकारक प्रकार असल्याचा आरोप कपिल माळकरी यांनी केला. आधी बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून पूर्वीप्रमाणे जुने मीटर बसवावेत, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली.दरम्यान सामाजिक कार्यकर्ते विश्वास बाली घाटे यांनी याबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून धारेवर धरत प्रश्नाची सरबत्ती केली.
मात्र हा शासन निर्णय आहे आम्ही त्याची अंमलबजावणी करत असल्याचे सांगितले. महावितरणच्या नवीन योजनांची स्पष्ट माहिती दिल्याशिवाय कोणतेही बदल स्वीकारले जाणार नाहीत, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य रवी कांबळे,शहाबुद्दीन टाकवडे,शशिकांत चौधरी,जमीर कागवाडे,बाबसो मालगावे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.