नागाव : शिरोली एमआयडीसी मध्ये एकाच रात्रीत चार कंपन्यांचे कुलूप तोडून तब्बल १५ लाख ३८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरोली एमआयडीसी येथील पहिल्या फाट्यावर असलेल्या 'दीप टॉवर्स' इमारतीमध्ये ही चोरीची घटना घडली. या इमारतीमधील 'दीप सेल्स अँड सर्व्हिसेस', 'दीप इंजिनिअरिंग सर्व्हिसेस', 'मेटासिस लॅब' आणि 'शिवम इंडस्ट्रिज' या कंपन्यांना चोरट्यांनी आपले लक्ष बनवले. फिर्यादी सुमीत दिलीप पवार (वय ३९, रा. आर. के. नगर, कोल्हापूर) व त्यांचे भाऊ अक्षय पवार यांच्या मालकीच्या या कंपन्या असून, ते एमआयडीसी परिसरातील विविध कंपन्यांना कारबाईड इन्सर्ट आणि टूल्स पुरवण्याचे काम करतात.
बुधवारी ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ६:३० ते ४ जून २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. चोरट्यांनी इमारतीचे मुख्य शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर स्टोअर रूमचे लॉक तोडून अतिशय महागडे व मौल्यवान कारबाईड टूल्स व तांब्याचे साहित्य अत्यंत शिताफीने चोरून नेले.
दीप सेल्स अँड सर्व्हिसेस: विविध आकाराचे कारबाईड इन्सर्ट व टूल्स (एकूण ३,००० नग) – किंमत रु. १०,२१,०००/- , दीप इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कारबाईड इन्सर्ट व टूल्स (६५० नग) तसेच ड्रील्स व एंडमिल (२४ नग) – किंमत रु. २,१७,६००/- इतक्या रकमेचे साहित्य चोरी झाले आहे. तर मेटासिस लॅब व शिवम इंडस्ट्रिज: कॉपर (तांबे) कॉपर राईज, कॉपर पट्ट्या व कॉपर स्क्रॅप (एकूण ४१ नग - वजन अंदाजे २०० किलो) – किंमत रु. ३,००,०००/, एकूण चोरी झालेला मुद्देमाल: रु. १५,३८,६००/- (पंधरा लाख अडतीस हजार सहाशे रुपये) किंमतीच्या साहित्याची चोरी झाली आहे.
गुरूवारी ४ जून रोजी सकाळी जेव्हा कर्मचारी कामावर आले, तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सुमीत पवार यांनी तात्काळ शिरोली पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या मोठ्या चोरीमुळे शिरोली एमआयडीसी परिसरातील उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिरोली मँन्युफँक्चरर्स असोसिएशन स्मँक येथील पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दुकानात एक नव्हे तर दोन वेळा अशी धाडसी घरफोडी झाले होती. या घटनेला काही महिन्यांचा कालावधी लोटला तरी या चोरी बाबत पोलीसांना आजवर कसलाही मागमूस लागलेला नाही.. या प्रमाणे आणखी अशा दाखल असलेल्या तसेच नसलेल्या चोर्यांचा तपास लावण्यात अपयश आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.