Certificate Pudhari
कोल्हापूर

Character certificate kolhapur : शिरोळ पोलिस ठाण्याची चरित्र प्रमाणपत्र सेवा ठप्प...!

१३ दिवसांपासून ऑनलाईन पोर्टल बंद; ५१ अर्ज रखडले, अर्जदारांचे हेलपाटे

पुढारी वृत्तसेवा

बिरू व्हसपटे

शिरढोण : नोकरी, शिक्षण आणि पासपोर्टसाठी अत्यावश्यक असलेले चरित्र प्रमाणपत्र मिळविण्याची ऑनलाईन सेवा शिरोळ पोलिस ठाण्यात गेल्या १३ दिवसांपासून ठप्प आहे. संबंधित पोर्टल बंद असल्याने तब्बल ५१ अर्ज प्रलंबित असून, प्रमाणपत्रासाठी अर्जदारांना वारंवार पोलिस ठाण्यात चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे अर्जदारांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

चरित्र प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर त्याची पडताळणी व पुढील प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाते. मात्र, गेल्या बारा दिवसांपासून पोर्टलच बंद असल्याने ही प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. परिणामी ५१ अर्जदार प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत.

नोकरी भरती प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्यासाठी तसेच शैक्षणिक कामकाज आणि पासपोर्टसाठी चरित्र प्रमाणपत्राची आवश्यकता भासते. त्यामुळे प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्यास अर्जदारांच्या महत्त्वाच्या कामांना विलंब होण्याची शक्यता आहे. पोलिस ठाण्यात चौकशी केल्यानंतर ‘पोर्टल बंद आहे’ असे सांगण्यात येत असल्याने अर्जदारांचा संताप वाढत आहे. तांत्रिक अडचण नेमकी काय आहे, ती कधी दूर होणार आणि प्रलंबित अर्जांचा निपटारा कधी होणार, याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम कायम आहे.

पोर्टल बंद; अर्जदार त्रस्त...!

गेल्या १३ दिवसांपासून चरित्र प्रमाणपत्राचे ऑनलाईन पोर्टल बंद असल्याने ५१ अर्ज प्रलंबित आहेत. नोकरी, शिक्षण आणि पासपोर्टसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी प्रमाणपत्राची गरज असतानाही अर्जदारांना पोलिस ठाण्याच्या चकरा माराव्या लागत आहेत. संबंधित यंत्रणेने तांत्रिक अडचण तातडीने दूर करून प्रलंबित अर्ज निकाली काढावेत, अशी मागणी होत आहे.

गेल्या १३ दिवसापासून संबंधित कंपनीला वारंवार तक्रार करून पोर्टल चालू करण्याची मागणी केली जात आहे.मात्र देखभाल दुरुस्तीसाठी पोर्टल बंद चालू होत असल्याची संबंधित खाजगी कंपनीकडून सांगितले जात आहे.पोर्टल सुरू झाल्यानंतर तातडीने सदर अर्जांचा निपटारा केला जाईल.
विलास निकम, गोपनीय विभाग शिरोळ पोलिस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT