कोल्हापूर

Kolhapur news | शिरढोण ग्रामपंचायतीचा अतिक्रमणावर हातोडा

पन्नास वर्षांपासून ताब्यात असलेली साडेतीन गुंठे जागा मुक्त; धडक कारवाईने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण : ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील वाल्मीक मंदिरालगत अतिक्रमण झालेल्या सी.स.क्रमांक ७२४ते७३१ या जागेवर धडक कारवाई करत सुमारे 3.5 गुंठे जागा ताब्यात घेतली. पन्नास वर्षांहून अधिक काळ अतिक्रमणाखाली असलेल्या जागेवर प्रथमच कारवाई झाल्याने गावात खळबळ उडाली. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने पूर्वसूचना देऊन संबंधित जागेची पाहणी केली होती. त्यानंतर महसूल व ग्रामपंचायत नोंदींची पडताळणी करून अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. कारवाईदरम्यान काही नागरिकांकडून विरोध करण्यात आला. यामुळे काही काळ किरकोळ वादावादीचा प्रसंग निर्माण झाला. मात्र प्रशासनाने कोणताही दबाव न स्वीकारता नियोजनबद्ध पद्धतीने अतिक्रमण हटवून जागा ताब्यात घेतली.

गावाच्या इतिहासात प्रथमच इतक्या जुन्या अतिक्रमणावर कारवाई झाल्याने या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. सार्वजनिक जागांवर झालेली अतिक्रमणे हटवून ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागा पुन्हा ताब्यात घेण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे. याबाबत ग्रामसेवक विराज जथे यांनी सांगितले की, गावातील इतर अतिक्रमित जागांचाही टप्प्याटप्प्याने आढावा घेतला जाणार असून नियमबाह्य अतिक्रमणांवर कारवाई करून त्या जागा ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेतल्या जाणार आहेत. या कारवाईत प्रशासक तथा सरपंच सागर भंडारे, ग्रामसेवक विराज जथे, वरिष्ठ लिपिक जब्बार नालबंद, भास्कर चौगुले, रवी मगदूम, अमर येंदु, संजय कांबळे, जिन्नप्पा कुगे, उदय कांबळे, निशिकांत जाधव,सुभाष शनवाडे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले...

येथील वाल्मीक मंदिरालगतच्या सी.स. क्रमांक ७२४ ते ७३१ जागेवरील कारवाईनंतर गावातील इतर अतिक्रमणधारकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे हटविण्याचा निर्धार व्यक्त केल्याने अनेकांनी स्वतःहून जागांची पडताळणी सुरू केली आहे. येत्या काळात आणखी अतिक्रमणांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत असून गावातील सार्वजनिक मालमत्ता मुक्त करण्यासाठी प्रशासनाने मोहीम हाती घेतल्याची चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT