भर पावसात धावत्या कारचा स्फोट, आगीत वाहन जळून खाक

Car fire news Parbhani | कारमधील सहा जण सुदैवाने बचावले
भर पावसात धावत्या कारचा स्फोट, आगीत वाहन जळून खाक
Published on
Updated on

मानवत : मानवत ते परभणी या राष्ट्रीय महामार्गावर मानवत तालुक्यातील ताडबोरगाव पाटी परिसरात भर पावसात धावत्या ईर्टिगा कारला अचानक आग लागली. यानंतर भीषण स्फोट झाल्याची थरारक दुर्घटना मंगळवारी (दि.13) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. यात काही क्षणांतच कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडून पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाहनातील सहाही प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १४ एएन १७२८ क्रमांकाची ईर्टिगा कार नगर जिल्ह्यातील जामखेड येथून परभणीकडे लग्न समारंभासाठी निघाली होती. चालक व वाहनमालक आकाश फाळके हे स्वतः वाहन चालवत होते. त्यांच्या भावाचे लग्न असल्याने नातेवाईकांसह प्रवास सुरू होता. या वाहनात महादेव आरेकर, दादा फाळके, काशिनाथ आरेकर, अधिनाथ फाळके, केशव फाळके व चालक आकाश फाळके असे एकूण सहा जण प्रवास करत होते.

दरम्यान, सायंकाळी मानवत तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू होता. जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते तसेच वाहनचालकांना कमी दृश्यमानतेचा सामना करावा लागत होता. अशाच परिस्थितीत वाहन ताडबोरगाव फाट्याजवळ पोहोचले असता कारच्या बोनटमधून धूर निघत असल्याचे चालक आकाश फाळके यांच्या लक्षात आले. काही क्षणातच बोनटमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्या.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने प्रसंगावधान राखत भर पावसातच वाहन तात्काळ रस्त्याच्या कडेला घेतले. त्यांनी वेळ न दवडता वाहनातील सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले. प्रवासी बाहेर पडताच काही क्षणांत आगीने विक्राळ रूप धारण केले. भर पावसातही आगीची तीव्रता एवढी प्रचंड होती की काही वेळातच कारमधून मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेल्याने परिसरात घबराट पसरली. पावसाच्या पाण्यातही वाहन धगधगत राहिले आणि अखेर संपूर्ण कार जळून खाक झाली.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. काही वाहनचालकांनी वाहने थांबवून प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यास मदत केली. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मानवत पोलीस कर्मचारी खंडेराया राऊत व ज्ञानेश चोपडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदतकार्य केले.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहन पूर्णपणे जळून खाक झाले. काही मिनिटांचा उशीर झाला असता मोठी दुर्घटना घडली असती, अशी चर्चा घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये सुरू होती. चालक आकाश फाळके यांच्या सतर्कतेमुळे सहा जणांचे प्राण वाचल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news