कोल्हापूर

Krishna river kolhapur : राजापूर बंधाऱ्यावर साडेतीन फूट पाणी; कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ सुरूच

Maharashtra river water level: पंचगंगा व कृष्णा खोऱ्यातील पावसाचा परिणाम...

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत हळूहळू वाढ होत असून राजापूर बंधाऱ्यावरून पाण्याचा विसर्गही वाढला आहे. सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाने गुरुवारी (३ जुलै) सकाळी ८ वाजता जाहीर केलेल्या अहवालानुसार, राजापूर बंधाऱ्याच्या बरग्यावरून साडेतीन फूट पाणी वाहत असून ३,२५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी १२.३ फूट इतकी नोंदविण्यात आली आहे.

कृष्णा नदीच्या वरच्या भागात पावसाचा जोर कायम असल्याने नदीत येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी वाढू लागले असून सायंकाळपर्यंत पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राजाराम बंधाऱ्यावरून ५,६३३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून तेथील नदीची पातळी १४.२ फूट इतकी आहे. कराड येथील कृष्णा पुलाजवळ नदीची पातळी १३.२ फूट, तर आयर्विन पुलाजवळ ८.१० फूट नोंदविण्यात आली आहे. बहे पुलाजवळ पाणीपातळी २.८ फूट, ताकारी पुलाजवळ १७ फूट, तर भिलवडी पुलाजवळ ८ फूट इतकी आहे.

धरणांतील पाणीसाठ्याबाबत, कोयना धरणात १६.०३ टीएमसी, वारणा धरणात ११.१७ टीएमसी, तर अलमट्टी धरणात २०.०७६० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. वारणा धरणातून १०० क्युसेक, तर अलमट्टी धरणातून ८२२ क्युसेक विसर्ग सुरू असल्याची नोंद पूर नियंत्रण कक्षाने केली आहे. पंचगंगा व कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम राहिल्यास राजापूर बंधाऱ्यावरील पाण्याची उंची आणि विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT