कोल्हापूर

Kolhapur rainfall news | मुसळधार पावसाने हलकर्णी-बसर्गे संपर्क तुटला; पर्यायी रस्ता वाहून गेल्याने नागरिकांची गैरसोय: पुलाचे काम रखडले

मुसळधार पावसामुळे या रस्त्यासाठी टाकलेला भराव, बायपाससह पाइप पूर्णपणे वाहून गेली

पुढारी वृत्तसेवा

सुभाष थोरात

हलकर्णी : रविवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे हलकर्णी-बसर्गे ओढ्यावरील पर्यायी रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याने दोन्ही गावांतील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

हलकर्णी-बसर्गे ओढ्यावरील पुलाचे नवीन बांधकाम गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. पुलाच्या कामादरम्यान वाहतुकीसाठी बाजूने पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यासाठी टाकलेला भराव, बायपाससह पाइप पूर्णपणे वाहून गेला. परिणामी हलकर्णी-बसर्गे मार्गावरील संपर्क तुटला आहे.

सध्या हलकर्णीला जाण्यासाठी नागरिकांना नंदनवाड मार्गे सुमारे पाच किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे. नवीन पुलाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आवश्यक गतीने काम पूर्ण न झाल्यामुळे ही गंभीर समस्या निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

या मार्गावरील एसटी सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती तसेच दैनंदिन प्रवासी यांची मोठी गैरसोय होत आहे. गंभीर रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यात नेणेही कठीण बनले असून आपत्कालीन सेवांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ओढ्याच्या पलीकडे अनेक हलकर्णीकरांची शेती असून सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाणेही जिकिरीचे बनले आहे. वाहतुकीची पर्यायी व्यवस्था तातडीने करावी तसेच पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT