Gram panchayat news pudhari photo
कोल्हापूर

Kolhapur news: ग्रामसचिवालयांची कामे निविदे अभावी रखडली!

शिरोळमध्ये ६ ग्रामपंचायती ग्रामसचिवालयाच्या प्रतीक्षेत; दोन महिन्यांपासून जिल्हा परिषदेकडे निविदा रखडल्या

पुढारी वृत्तसेवा

बिरू व्हसपटे

शिरढोण : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त असल्याने त्यांच्या निर्णय अधिकारावर न्यायालयीन बंधने आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या पातळीवर ग्रामसचिवालयांच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया न राबविता ती जिल्हा परिषद पातळीवर घेण्याचे ठरले आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून निविदा प्रक्रिया रखडल्याने मंजूर ग्रामसचिवालयांची कामेही रखडली आहेत.शिरोळ तालुक्यातील सहा गावे ग्रामसचिवालयाच्या प्रतीक्षेत आहेत.

शिरढोण, नांदणी, कोथळी, शेडशाळ,शिरटी आणि जांभळी या सहा गावांमध्ये ग्रामसचिवालयांच्या इमारतींसाठी निधी मंजूर झाला आहे. गावातील नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली मिळाव्यात, ग्रामपंचायतीचे कामकाज सुसज्ज पद्धतीने चालावे, या उद्देशाने ही ग्रामसचिवालये उभारण्यात येणार आहेत.

ग्रामसचिवालयासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानातून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची झाला आहे. मात्र, निविदा प्रक्रियेला विलंब होत असल्याने प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे मंजूर निधी असूनही ग्रामसचिवालयाचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक असल्याने ग्रामपंचायत पातळीवर निविदा काढण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून निविदा काढून पुढील कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले. मात्र, दोन महिन्यांपासून निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने ग्रामसचिवालयांच्या कामांना मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे.

निधी मंजूर; कामाची प्रतीक्षा

ग्रामसचिवालयांसाठी शासनाकडून निधी मंजूर असतानाही निविदा प्रक्रियेमुळे कामे रखडली आहेत. जिल्हा परिषदेने तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करून संबंधित गावांच्या ग्रामसचिवालयांच्या बांधकामाला सुरुवात करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT