Nandatai Babhulkar  Pudhari
कोल्हापूर

Kolhapur NCP | स्थापना दिनीच राष्ट्रवादी शरद पवार गटात खदखद; महायुतीला पाठिंबा देण्याचा अधिकार नंदाताई बाभुळकर यांना कोणी दिला?

पक्षाच्या अधिकृत भूमिकेविना हा निर्णय घेतल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षांकडून पत्रक

पुढारी वृत्तसेवा

Chandgad Nandatai Babhulkar Mahayuti Support Dispute

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनीच कोल्हापूर जिल्ह्यात पक्षांतर्गत वाद उफाळून आल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. गोकुळ दूध संघ आणि के.डी.सी. बँकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या नंदाताई बाभुळकर-कुपेकर यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर पक्षात नाराजीचा सूर उमटला आहे. या निर्णयावर पक्षाच्या कार्याध्यक्षांनी तीव्र आक्षेप घेत थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

गोकुळ दूध संघ आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (के.डी.सी. बँक) यांच्या निवडणुका जवळ आल्या असून, जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच नंदाताई बाभुळकर-कुपेकर यांनी महायुतीला, पर्यायाने मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाला पाठिंबा जाहीर केल्याचे समोर आले. मात्र, पक्षाच्या अधिकृत भूमिकेविना हा निर्णय घेतल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षांनी त्याविरोधात पत्रक काढले आहे.

कार्याध्यक्ष ॲड. अनिल घाटगे यांनी आपल्या पत्रातून, "महायुतीला पाठिंबा देण्याचा अधिकार नंदाताई बाभुळकर-कुपेकर यांना कोणी दिला?" असा थेट सवाल उपस्थित केला आहे. प्रदेश कार्यालयाकडून किंवा जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना अथवा आदेश नसताना असा निर्णय जाहीर करण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, गोकुळ दूध संघ आणि के.डी.सी. बँक या दोन्ही संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सक्षम आणि पात्र उमेदवार उपलब्ध आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये पक्षाला सन्मानपूर्वक जागा मिळायला हव्यात. पक्षाच्या ताकदीवर निवडणुका लढविण्याची क्षमता असताना दुसऱ्यांच्या पाठिंब्याची गरज नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

"कोणाच्याही पाठीमागून जायचे नाही, हे लक्षात ठेवा," असा स्पष्ट इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनीच समोर आलेल्या या वादामुळे आगामी सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाची नेमकी भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नंदाताई बाभुळकर-कुपेकर यांच्या भूमिकेबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार आणि या वादावर पडदा कसा पडणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT