kolhapur municipal elections
कोल्हापूर: "कोल्हापूरला आजवर अनेक सम्राटांची सवय आहे. इथे काही साखरसम्राट आहेत, तर काही शिक्षणसम्राट. मात्र, महायुतीचे उमेदवार हे केवळ 'कार्यसम्राट' आहेत. आम्ही सत्तेचे मालक नाही, तर जनतेचे सेवक म्हणून काम करणारे आहोत," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि. १०) विरोधकांवर हल्लाबोल केला. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. ही केवळ प्रचार सभा नसून विजयाची सभा आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, "प्रभू रामचंद्रांनी १४ वर्षे वनवास सहन केला, पण कोल्हापूरच्या जनतेने काँग्रेसच्या काळात १५ वर्षांचा वनवास सहन केला आहे. आता विकासाची वेळ आली असून महायुतीशिवाय दुसरा पर्याय नाही. कोल्हापूर महानगरपालिकेवर आता महायुतीचाच भगवा फडकणार आणि १६ तारखेला विजयाचा गुलाल आपणच उधळणार, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
"लाडक्या बहिणींचा प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. त्यांनी ही योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात धाव घेतली, पण ही योजना कधीही बंद होणार नाही. या दुष्ट भावांपासून सावध राहा, वेळ पडल्यास लाडक्या बहिणी अशा दुष्ट भावांना जोडा दाखवतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
"आम्ही फेसबुक लाईव्ह करणारे लोक नाही, तर जमिनीवर उतरून काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत, आमच्याकडे 'प्रिंट मिस्टेक' चालत नाही," असेही ते म्हणाले. कोल्हापूरची ओळख केवळ तांबडा-पांढरा रस्सा इतकीच नसून ती सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरला दिलेल्या विकासनिधींची माहिती दिली. तसेच यापुढेही पैशाअभावी कोल्हापूरचे एकही विकासकाम थांबणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
"कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी आहे, इथे अंगाला माती लावूनच मैदानात उतरावे लागते. कोल्हापूरकरांच्या रक्तात पाठीमागून वार करणे नाही, तर समोरासमोर भिडण्याची ताकद आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत विकासाला साथ द्या," असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.