Satej Patil on KMC Election Result
कोल्हापूर : "महापालिका निवडणुकीत तुम्ही सगळेएकटे लढला असता, तर तुम्हाला तुमच्या पक्षाची वैयक्तिक ताकद कळाली असती. तुम्ही एकत्रित लढलात आणि मी एकटा लढलो, यात फरक आहे. ३५ जागांवर पोहोचणे हे केवळ कोल्हापूरकरांच्या आशीर्वादामुळे शक्य झाले," अशा शब्दांमध्ये सतेज पाटील यांनी 'पुढारी न्यूज'शी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत आमचा एक उमेदवार केवळ १६ मतांनी तर १०० आणि १५० मतांच्या फरकाने आमचे चार उमेदवार पराभूत झाले आहेत. अन्यथा आम्ही बहुमताचा आकडा निश्चितपणे गाठू शकलो असतोतुम्ही एकत्रित लढलात आणि मी एकटा लढलो परंतु, मला कोल्हापूरकरांचे आभार मानायचे आहेत की, या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि दबावाच्या राजकारणात सुद्धा कोल्हापूरकरांनी आम्हाला ८१ पैकी ३५ जागांचा कौल दिला. कदाचित पाच-सहा जागा अजून आल्या असत्या तर बहुमत झाले असते, असेही सतेज पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूरकरांची ही ताकद आहे की, मी एकटा लढत असताना सुद्धा तमाम कोल्हापूरकर माझ्या पाठीशी उभे राहिले आणि आमच्या उमेदवारांना लाखो मते दिली. भाजपवाले आमच्या ७५ ते ७८ जागा येतील, असा दावा करत होते; पण त्यांच्या फक्त २६ जागा आल्या; शिंदे सेनेच्या १५-१६ आणि राष्ट्रवादीच्या (NCP) चार जागा आल्या आहेत. मुळात या निवडणुकीत तुम्ही सगळे 'महायुती' म्हणून लढलात. तुम्ही एकटे लढला असता, तर तुम्हाला प्रत्येक पक्षाची वैयक्तिक ताकद कळाली असती, असेही सतेज पाटील यांनी सुनावले.
'अक्षय जरग' हा विषय आमच्यासाठी थोडा त्रासाचा झाला. त्या दोन प्रभागांतील लोकांची आम्ही समजूत काढू शकलो नाही. तसेच 'क्रॉस वोटिंग'चा मोठा फटका आमच्या पराभूत उमेदवारांना बसला आहे. काही भागांत उमेदवारांना स्वतःच्या विजयाची खात्री वाटत नव्हती, त्यामुळे तिथे क्रॉस वोटिंग झाले, असेही सतेज पाटील म्हणाले.
काही लोक म्हणतात की, कोल्हापूर शहर आता 'पुरोगामी' राहिले नाही, पण तसे म्हणता येणार नाही. हा केवळ तांत्रिक विजय आहे. आमचे उमेदवार १००-१५० मतांनी पडले आहेत. बंडखोरांची मते एकत्र केली तर लक्षात येईल की कोल्हापूरकर आजही पुरोगामी विचारांचे आहे. म्हणूनच या वातावरणातही आम्ही आमचा गड राखून ठेवला. लातूरमध्ये अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि वंचित आघाडीने झेंडा फडकवला आहे. या निकालावरून आता स्पष्ट झाले आहे की, महाराष्ट्रात भाजपचा मुख्य विरोधी पक्ष 'काँग्रेस'च आहे, असेही सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.