पाऊस 
कोल्हापूर

कोल्हापूर : सरासरी न गाठता मान्सूनचा परतीचा प्रवास

कोल्हापूर जिल्ह्यात चार महिन्यांत बरसला 1,407.0 मि.मी. पाऊस

पुढारी वृत्तसेवा
आशिष शिंदे

कोल्हापूर : यंदाच्या हंगामात काही दिवस कोसळधारा, मुसळधार, धुवाँधार, तर काही दिवस अधूनमधून हलक्या सरी, असा काहीसा पावसाचा प्रवास राहिला. पाऊस घेऊन येणार्‍या या ढगांची जिल्ह्यातून लवकरच परतीच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. या चार महिन्यांतील मान्सूनचा प्रवास पाहता, गत पाच वर्षांप्रमाणे यंदाही जिल्ह्यात पावसाला सरासरी गाठता आली नाही. यंदा 1 जून ते 13 सप्टेंबर या कालावधीत 1,407.0 मिलिमीटर पाऊस झाला. पावसाने 2023 व 2022 सालचे विक्रम तोडले; पण महत्त्वाची बाब म्हणजे, पावसाचे तालुके म्हणून ओळख असणार्‍या राधानगरी, गगनबावडा, चंदगड या तालुक्यांत पावसाला सरासरी गाठता आलेली नाही.

सप्टेंबर महिना संपण्यास आणखी पंधरवडा बाकी असला, तरी यंदाही पाऊस चार महिन्यांच्या सरासरीपासून दूर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 1 जून ते 30 सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाच्या हंगामात सरासरी 1,733.1 मि.मी. पाऊस होतो; तर 1 जून ते 12 सप्टेंबर या कालावधीत सरासरी 1,620.4 मि.मी. पाऊस होतो. ही सरासरी पावसाला गाठता आली नसून, यंदा सरासरीच्या केवळ 86.8 टक्के पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, कागल, गडहिंग्लज, भुदरगड, आजरा या तालुक्यांत पावसाने सरासरी गाठली आहे. दहा वर्षांत दोनदाच 1,400 मि.मी. पार दहा वर्षांत पावसाने 1,400 मि.मी.चा टप्पा 2021 साली एकदाच ओलांडला होता. त्यानंतर यंदा 1,407.0 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या दहा वर्षांतील पावसाच्या सीझनमधील सरासरीची तुलना करता हे प्रमाण अधिक आहे.

पावसाच्या तालुक्यांतच गाठली नाही सरासरी

यंदा पावसाने नऊ तालुक्यांमध्ये दमदार हजेरी लावली. मात्र, राधानगरी, गगनबावडा, चंदगड या पावसाच्या तालुक्यांमध्येच पावसाला सरासरी गाठता आलेली नाही. गगनबावड्यात 1 जून ते 13 सप्टेंबर या कालावधीत 4,860.5 मि.मी. पाऊस होतो, यंदा 3,330.0 पाऊस झाला. राधानगरीत 3,285.7 पाऊस होतो, यावेळी 1,927.4 पाऊस झाला; तर चंदगडमध्ये 2,502.2 मि.मी. पाऊस बरसतो, यावर्षी 1,891.9 मि.मी. पाऊस झाला आहे.

2019 मध्ये गाठली होती सरासरी

जिल्ह्याला 2019 साली प्रलयंकारी महापुराचा विळखा बसला होता. सर्वदूर झालेल्या धुवाँधार पावसाने सरासरी ओलांडली होती. 2019 साली 2,044.8 मि.मी. पाऊस झाला होता. गेल्या दहा वर्षांमध्ये पावसाने केवळ 2019 मध्ये सरासरी गाठली. यानंतर एकदाही पावसाला सरासरी गाठता आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT