कोल्हापूर

Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात मठगजापूर शाळा अव्वल

अविनाश सुतार

विशाळगड: पुढारी वृत्तसेवा : बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाने इतिहासात अजरामर झालेल्या पावनखिंडीतील मठगजापूर प्राथमिक शाळेने 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या अभियानात शाहूवाडी तालुक्यात बाजी मारत अव्वल ठरली. सर्व सोयी-सुविधांनी युक्त गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून नावारूपाला आली आहे. याचे सर्व श्रेय येथील शिक्षक, स्थानिक लोक तसेच शाळा व्यवस्थापन समितीला जाते. Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala

'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत संपूर्ण शाळेचे सुशोभीकरण, विषयानुरूप तक्ते, प्रतिकृती, सुविचार, बोधपर चित्रांच्या माध्यमातून संपूर्ण शाळा व वर्ग सजावट, बोलक्या भिंती, भिंतीवर आरोग्यविषयक घोषवाक्ये, पाणी वाचवा यासारख्या संकल्पना साकारल्या आहेत. विद्यार्थी, शिक्षक यांची आरोग्य तपासणी, आरोग्यविषयक चांगल्या सवयी, शाळेमध्ये 'एक मुल, एक झाड' नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रत्येक वर्गात विद्यार्थी मंत्रिमंडळ, अध्ययनात तंत्रज्ञानाचा वापर, विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी, यासाठी विद्यार्थी बँक, विद्यार्थ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने कंपोस्ट खत युनिट, शाळा परिसरातील प्लास्टिक व कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे. Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala

राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर आयोजित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, योगा, संगीत, नृत्य, चित्रकला, क्रीडा स्पर्धा, याचबरोबर मेरी माटी, मेरा देश, वीरगाथा, वाचन प्रेरणा दिवस, तंबाखूमुक्त शाळा अभियान, स्वच्छता मॉनिटर यामध्ये या शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन यशही मिळविले आहे. पावसाच्या पाण्याचा जमिनीमध्ये निचरा व्हावा, यासाठी व्यवस्था, गाव, वस्ती व घरांमध्ये विद्यार्थी स्वच्छतेचे संदेश देत आहेत. अशा सर्व नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबविले जात असल्याने मूल्यांकन समितीने योग्य मुल्यांकन करून शाळेला प्रथम क्रमांक दिला आहे. शाळा तालुकास्तरावर ३ लाखांच्या बक्षिसास पात्र ठरली आहे. शिवाय तिची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे.

'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार, केंद्रप्रमुख बी. बी. कोंडावळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्याध्यापक मारोती शेट्टेवाड, जगन्नाथ कांबळे, प्रवीण भोसले, अंकुश पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.

शाळेने नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यात येथील शिक्षक मेहनत घेतात. गावचा विकास शाळेमुळे होतो. त्यामुळे शाळा विकासाला प्राधान्य दिले जाते. तालुक्यात प्रथम क्रमांक शाळेला मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

चंद्रकांत पाटील, सरपंच, गजापूर

शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग आहेत. शाळा विविध उपक्रमांत सहभागी होते. त्यात ती यशस्वी होते. शाळा प्रतिकूल परिस्थितीशी सामना देत गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे. याचा मनस्वी आनंद आहे.

मारोती शेट्टेवाड, मुख्याध्यापक

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT