कोल्हापूर : वैवाहिक समस्या, कुटुंब कलह सोडविण्यासाठी विद्यापीठाचे पाऊल | पुढारी

कोल्हापूर : वैवाहिक समस्या, कुटुंब कलह सोडविण्यासाठी विद्यापीठाचे पाऊल

कोल्हापूर, प्रवीण मस्के : दिवसेंदिवस विभक्त कुटुंब पद्धतीने निर्माण होणारे कलह, विवाहांमधील समस्यांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. यासाठी शिवाजी विद्यापीठाने विधायक पाऊल उचलले असून फॅमिली अँड मॅरेज कौन्सिलिंग कोर्स सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे कुटुंब आणि विवाह संस्थेला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे.

व्यक्ती हाच कुटुंबाचा भाग असून त्याची जडणघडण कुटुंबातच होते. मात्र, गेल्या काही वर्षांत कुटुंब संस्थेत महत्त्वाचे बदल झाले असून व्यक्ती आत्मकेंद्री बनत चालली आहे.

एकत्र कुटुंबपद्धती कमी होऊन विभक्त कुटुंबे दिसत आहेत. यामुळे जुन्या जाणत्या माणसांचे अनुभव, मार्गदर्शन मिळणे अवघड झाले असून कुटुंबातील संवाद खंडित होत आहे.

विवाह हा व्यक्तिगत विषय असला तरी यामुळे निर्माण होणार्‍या समस्यांचे पडसाद कुटुंब व समाजव्यवस्थेवर उमटत आहेत. विवाहाबाबत मुला-मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या, त्यातून निर्माण होणारे ताणतणाव, त्याचे घटस्फोटात पर्यवसान या गोष्टी समाजाच्या द़ृष्टीने गंभीर आहेत. 2023 मध्ये क्षुल्लक व किरकोळ +कारणावरुन कोल्हापूर जिल्हयात 220 हून अधिक घटस्फोटाची प्रकरणे समोर आली आहेत. यासाठी समुपदेशन काळाची गरज बनली आहे.

व्यक्ती व कुटुंबाचे समुपदेशन करणार्‍या संस्थांचे प्रमाण कमी आहे. याचा विचार करुनच कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने फॅमिली अँड मॅरेज कौन्सिलिंग कोर्स सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास अधिसभेने मंजुरी दिली आहे. यानंतर हा प्रस्ताव विद्यापरिषद व नंतर व्यवस्थापन परिषदेपुढे ठेवला जाणार आहे. समाजशास्त्र विभाग, मानसशास्त्र विभाग व स्त्री अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम चालविला जाणार आहे. या कोर्समध्ये कुटुंब आणि विवाहित जोडपे यांचे समुपदेशन केले जाणार आहे. लग्न संस्थेतील सर्व घटकांचे समुपदेशनदेखील होणार आहे. गावोगावी जाऊन समुपदेशक सामाजिक समुपदेशनाचे काम करतील. यातून सामाजिक स्वास्थ्य सुधारण्यास हातभार लागणार आहे.

रोजगाराच्या नवीन संधी

खासगी पातळीवर समुपदेशकांकडून समुपदेशन करून घेणे फार खर्चिक आहे. विद्यापीठाच्या वतीने सुरू होत असलेल्या नव्या कोर्समुळे तरुण समुपदेशक तयार होतील. तरुण समुपदेशक इतरांचे शास्त्रीय पद्धतीने समुपदेशन करू शकतील. याच्या माध्यमातून नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Back to top button