कोल्हापूर

कोल्हापूर : वन्यप्राण्यांकडून पाच वर्षात १७ कोटी २६ लाखांचे नुकसान

मोहन कारंडे

सोहाळे; सचिन कळेकर : अलिकडच्या काळात वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी, पशुहानी व पीकहानीच्या भरपाईपोटी जिल्ह्याच्या वनविभागाला १७ कोटी २६ लाखांचा भुर्दंड पडला आहे. गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत ही प्रचंड भरपाई वनविभागाला द्यावी लागली आहे. पाच वर्षाच्या पाठीमागील नुकसान भरपाई पाहता यावर्षी १ कोटी २६ लाखांची वाढ झाली आहे. यावरुन वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीत वाढ होत असल्याचे चित्र स्पष्ट होत असून जिल्ह्यातील शेतकरी हवालदील झाला आहे.

जिल्ह्यातील आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी आदी तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर वन्यप्राण्यांचा धुडगूस सुरु आहे. वन्यप्राण्यांची संख्या अधिक वाढली असून रात्रीबरोबरच आता दिवसाही वन्यप्राणी जंगल सोडून खाजगी क्षेत्रात दिसत आहेत. तसेच नागरी वस्तीजवळूनही गवे, हत्ती, बिबट्या, तरससारखे वन्यप्राणी चाल करु लागले आहेत. वन्यप्राण्यांच्या त्रासाने शेतकरीवर्ग हैराण झाला आहे. आजरा तालुक्यात गेल्या १७ वर्षांपासून हत्तींकडून प्रचंड नुकसान सुरु आहे. वन्यप्राणी व मानव हा संघर्ष वाढतच चालला आहे. गेल्या पाच वर्षात ७८ जणांवर वन्यप्राण्यांनी हल्ला केला आहे. त्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६८ जण जखमी झाले आहेत. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये गंभीर जखमीसह मृत्यू झालेल्यांच्या वारसांना वनविभागाकडून २ कोटी १४ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. २०१८-१९ मध्ये एकाचा मृत्यू झाला व ११ जण जखमी झाले होते. यावर्षी २०२२ – २३ मध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तर १४ जण जखमी झाले आहेत.

मनुष्यहानीप्रमाणे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशुधनाचे देखील नुकसान झाले आहे. धनगर बांधवांसह शेतकऱ्यांच्या गुरांवर वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये अनेक गुरांचे मृत्यू झाले आहेत. गेल्या पाच वर्षात हल्ल्यात ४७४ पशू दगावली आहेत. या नुकसानभरपाईपोटी पशुपालकांना १ कोटी ६७ लाख रुपयांची मदत वनविभागाने केली आहे. सन २०१८-१९ मध्ये ३३ पशु दगावले होते. त्यामध्ये वाढ झाली असून सन २०२२ – २३ मध्ये २५६ पशु दगावली आहेत. याशिवाय वन्यप्राणी जंगलालगतच्या शेतांमध्ये घुसून उभ्या पिकाचे नुकसान करीत आहेत. पिक नुकसानीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वनविभागाच्या नोंदीनुसार गेल्या पाच वर्षात २६ हजार ९५७ पीक नुकसानीच्या दाखल प्रकरणी १३ कोटी ४४ लाखांचे नुकसान झाले आहे.

२०१८-१९ मध्ये ३८८२ शेतकऱ्यांना २ कोटी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई वनविभागाने दिली होती. यंदा म्हणजेच २०२२-२३ मध्ये नुकसानीत वाढ झाली आहे. ६३२४ शेतकऱ्यांचे ३ कोटी ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या पाच वर्षाच्या नुकसान भरपाईच्या आकडेवारीवरुन प्रचंड प्रमाणावर वन्यप्राण्यांकडून नुकसानी सुरु असल्याचे स्पष्ट होते. या त्रासाने जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमिन पडीक पडली आहे. अस्मानी संकटाबरोबरच वन्यप्राण्यांच्या त्रासाने शेतकरी हतबल झाला आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करावा व जंगलागतच्या शेतकऱ्यांना कायमस्वरुपी मदत होईल, असे धोरण ठरविण्याची गरज निर्माण झाली आहे.

२०१९ ते २०२३ मधील नुकसान प्रकरणे (कंसात भरपाई )

मृत व्यक्ती : १० (१ कोटी ५३ लाख)
जखमी व्यक्ती : ६८ (६१ लाख)
मृत पशु : ४७४ (१ कोटी ६७ लाख)
पीक नुकसानी : २६९५७ (१३ कोटी ४४ लाख)

सध्या दिली जाणारी नुकसान भरपाई ही पेरणीच्या खर्चाच्या आधारे दिली जाते. मात्र ही मिळणारी भरपाई तुटपुंजी आहे. भरपाईकरीता जमा करावयास लागणारी कागदपत्रे व लागणारा वेळ पाहता भरपाई नसलेली बरी असे वाटते. त्यामुळे शासनाने भरपाईत वाढ करावी व वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवावी.
– चंद्रकांत कोंडूसकर, शेतकरी, सोहाळे

 

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT