कोल्हापूर ब्रेकिंग अपडेट:
कोल्हापूर शहरात एक बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. विवेकानंद कॉलेज परिसर, मेरी वेदर ग्राउंड आणि वूडलँड हॉटेल परिसरात या बिबट्याने थैमान घातलं. अखेर तब्बल दीड तासांच्या थरारक मोहिमेनंतर वनविभागाच्या पथकाला बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं.
शहरात घुसलेल्या बिबट्याने आज सकाळी अक्षरशः धुमाकूळ घातला. विवेकानंद कॉलेज आणि हॉटेल वूडलँड परिसरात झालेल्या या घटनेने संपूर्ण शहर हादरलं. बिबट्याला पकडताना झालेल्या झटापटीत पोलिस कॉन्टेबल कृष्णा पाटील आणि माळी कामगार तुकाराम खोंदल जखमी झाले.
घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, त्यांचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले, जखमी पोलिसांना पाहताच त्यांची लेक धावत जाऊन त्यांना मिठी मारली “पप्पा तुम्हाला काय झालं नाही ना ?” असं म्हणत धाय मोकलून रडू लागली. हा क्षण पाहून उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
दरम्यान, या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एकूण तीन जण जखमी झाले आहेत. वनविभाग आणि पोलिसांनी दीड तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला गुंगीचं इंजेक्शन देऊन पकडण्यात यश मिळवलं. शहरात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला आता थोडा दिलासा मिळाला आहे, पण जखमींच्या कुटुंबीयांसाठी हा दिवस विसरणं कठीण ठरणार आहे.
हा बिबट्या नेमका कुठून आला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिस आणि वनविभाग या प्रकरणाचा तपास करत आहेत. यापूर्वीही २०१५ साली रुईकर कॉलनी परिसरात बिबट्या दिसला होता, तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता. शहरात अशा प्रकारची घटना पुन्हा घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, मात्र बिबट्याला जेरबंद केल्याने आता कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे.