voter list Pudhari
कोल्हापूर

Voter Registration Kolhapur | कुरुंदवाडात संथ मॅपिंग प्रक्रियेमुळे मतदार नोंदींवर संकट; नागरिकांचा अल्प प्रतिसाद

निवडणूक विभाग आणि कुरुंदवाड पालिकेतर्फे 2002 आणि 2024 च्या मतदारयादीचे मॅपिंग

पुढारी वृत्तसेवा

Kurundwad voter registration issue

कुरुंदवाड : कुरुंदवाड शहरात मतदारयादी मॅपिंग प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने भविष्यात अनेक मतदारांची नावे यादीतून वगळली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने ही प्रक्रिया रखडली आहे.

निवडणूक विभाग आणि कुरुंदवाड पालिकेतर्फे 2002 आणि 2024 च्या मतदारयादीचे मॅपिंग करण्यात येत आहे. या प्रक्रियेत दोन्ही यादीतील नावे पडताळली जात असून, 2002 च्या यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी कुटुंबातील इतर सदस्यांच्या नोंदींचा आधार द्यावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मात्र, 1 एप्रिल ही अंतिम मुदत जवळ येऊन ठेपली असतानाही नागरिकांमध्ये या प्रक्रियेबाबत उदासीनता दिसून येत आहे. बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) मार्फत घरोघरी जाऊन माहिती संकलन सुरू असले, तरीही शहरात या उपक्रमाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे प्रशासनासमोर मॅपिंगचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

मॅपिंगसाठी 2002 च्या मतदारयादीत नाव नसलेल्या नागरिकांनी जमीन किंवा मालमत्तेची कागदपत्रे, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट, आधारकार्ड यांसारख्या ओळखपत्रांपैकी किमान एक-दोन पुरावे सादर करणे आवश्यक आहे. नवमतदारांच्या बाबतीत त्यांच्या पालक किंवा आजोबांच्या नावांचा 2002 च्या यादीतील दाखला ग्राह्य धरला जाणार आहे. तसेच, परगावाहून स्थलांतरित झालेल्या नागरिकांनी आपल्या मूळ गावातील मतदारयादीतील नोंदी सादर कराव्यात, असेही सांगण्यात आले आहे. नवविवाहित महिलांसाठी माहेरच्या कुटुंबातील 2002 सालची मतदारयादी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

स्थानिक पातळीवर या प्रक्रियेबाबत जागरूकतेचा अभाव प्रकर्षाने जाणवत असून, अनेकांना मॅपिंगचे महत्त्व अद्याप पूर्णपणे समजलेले नाही. त्यामुळे जनजागृती मोहीम राबवण्याची गरज व्यक्त होत आहे.

मॅपिंगची संथ गती चिंताजनक

कुरुंदवाड शहरातील एकूण 22 हजार 224 मतदारांपैकी केवळ 20 ते 30 टक्के मॅपिंग पूर्ण झाले आहे. तर संपूर्ण शिरोळ तालुक्यात ही टक्केवारी सुमारे 40 टक्क्यांपर्यंतच मर्यादित आहे. नागरिकांचा कमी प्रतिसाद आणि आवश्यक कागदपत्रांचा अभाव यामुळे प्रक्रिया मंदावली असून, प्रशासनासमोर वेळेत काम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT