कुरुंदवाड : इचलकरंजी शहराला वरदान ठरलेल्या कृष्णा नळ पाणी योजना कुरुंदवाड शहरासाठी अभिशाप बनत चालली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाणी उपसापासून ते योजनेच्या ठिकाणापर्यंत ठिकठिकाणच्या गावात वारंवार पाईपलाईनला मोठी गळती लागते आणि लाखो लिटर पाणी वाया जाते. महापुराचे पाणी ओसरल्यानंतर बस्तवाड रस्त्यावर मोठी गळती लागली आहे.
कुरुंदवाड-इचलकरंजी कृष्णा पाणी योजनेच्या गळतीचा प्रश्न जटील झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी याच रस्त्यावर मोठी गळती लागली होती. तर शिरढोण पुलाजवळ गळती लागून सागर सावगवे यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले होते. इचलकरंजी पर्यंतच्या गावातील रस्त्याचे आणि शेतीचे गळतीमुळे नुकसान झाले आहे. बस्तवाड रस्त्यावर बुधवारी (दि.७) महापुराचे पाणी ओसरल्यानंतर दुपारी ४ वाजता अचानक मोठी गळती लागली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
पाईपलाईनच्या गळतीबद्दल वारंवार अधिकाऱ्यांना सांगूनही संबधित अधिकारी दुर्लक्ष करतात. त्यामुळे या गळतीच्या यातना कुरुंदवाड, शिरढोण टाकवडेच्या ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना भोगाव्या लागत आहेत.
शिरढोण-टाकवडे परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर केवळ तक्रार आहे, म्हणून रस्ता उखरून ठेवायचे आणि लिकेज सापडले नाही. म्हणून पुन्हा ते खड्डे मुजवायचे, हा प्रकार सुरू असल्याने लोक त्रस्त झाले आहेत. पाणी उपसापासून ते योजनेच्या ठिकाणापर्यंत एकदा हा गळतीचा विषय तपासून बघा अन्याथा या तिन्ही गावातून या योजनेला तीव्र विरोध करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया आता ग्रामस्थांमधून केली जात आहे.