बांबवडे : पुढारी वृत्तसेवा
चरण (ता. शाहूवाडी) येथे ऊसाच्या शेतात तुटून पडलेल्या विद्युत भरीत तारेचा स्पर्श होऊन मारुती पांडुरंग लाड (वय. ५५ ) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. चरण येथील गुरावकी नामक शेतात शुक्रवारी (दि.२) सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणाचा कोपार्डे घटनेपाठोपाठ आणखी एका शेतकऱ्याचा बळी गेल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, चरण (ता. शाहूवाडी) येथील मारुती पांडुरंग लाड हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी जनावरांना चाऱ्यासाठी गावालगतच्या गुरवकी क्षेत्रातील ऊसाच्या शेतात पाला काढण्यासाठी गेले होते. यावेळी आधीच या क्षेत्रातून गेलेल्या विजेच्या खांबावरील एक विजवाहिनी तुटून जमिनीवर पडली होती. उभ्या ऊसामुळे ही विजवाहिनी नजरेस न आल्यामुळे मारुती लाड यांचा या तारेला स्पर्श झाला. यामध्ये विजेच्या तीव्र धक्क्याने त्यांचा काही क्षणात जागीच मृत्यू झाला. सकाळी लवकर उठून वैराणीला गेलेले लाड उशिरापर्यंत घरी परतलेच नाही. नातेवाईकांसह शेजारीपाजारी मिळून त्यांचा अनेक ठिकाणी शोध घेतला. नेमके कोणत्या शेतात वैराणीसाठी गेलेत याची माहिती नसल्याने त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. काही वेळाने गुरवकीतल्या ऊसाच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. याचवेळी सुदैवाने वीजप्रवाह खंडित झालेला होता. अन्यथा शेतात शोध मोहीम राबविणाऱ्या आणखी पाचजणांच्या जीवावर बाका प्रसंग बेतला असता. या सर्वांच्या बलवत्तर नशिबाने मोठा अनर्थ टळला. अशी येथे चर्चा सुरू होती.
दरम्यान, तुटलेल्या विजवहिनीमुळे दुर्घटना घडल्याचे समजल्यानंतर महावितरण कंपनीच्या बांबवडे कार्यालयाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली. शाहूवाडी पोलिसांनी जागेवर पंच साक्षीदारांसमक्ष पंचनामा प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह मलकापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवून दिला. शवविच्छेदानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. चरण येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत लाड यांची घरची परिस्थिती खूपच हालाखीची आहे. महावितरण कंपनीने त्यांच्या कुटुंबियांना तातडीने सानुग्रह भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मृत लाड यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली असा परिवार आहे. मनमिळावू आणि गरीब स्वभावाचे मारुती लाड यांच्या या मृत्यूने चरण परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.