किणी : पुणे बंगळुरू महामार्गावरील टोल वसुली बंद करावी या मागणीसाठी शनिवारी करण्यात आलेल्या आंदोलनात महामार्ग रोखणाऱ्या राहूल खंजिरे, शशिकांत खवरे, दुर्वास कदम यांचेसह बावीस कार्यकर्त्यांवर आज वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
संजय पवार-वाईकर, प्रशांत कांबळे, विक्रम खवरे, शशिकांत खवरे, सनी शिंदे, उत्तम पाटील, बाजीराव सातपुते, कपिल पाटील, विश्वनाथ पाटील, मोहन सालपे, अजित धामोडकर, रमेश उर्फ नाना उलपे, उत्तम सावंत, तानाजी सावंत, राहुल खंजिरे, सुभाष उर्फ बापू जाधव, दुर्वास उर्फ पप्पू कदम, बबन रानगे, शहाजी सिद, विलास जाधव, सुरेंद्र घोंगडे, संपत भोसले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या बाबत माहिती अशी की, महामार्गाची झालेली दुरावस्था व सहा पदरीकरण पूर्ण झाल्याशिवाय टोलची आकारणी करू नये यासाठी शनिवारी सकाळी काँग्रेसच्या वतीने आ. सतेज पाटील, आ. राजू आवळे, आ. जयश्री जाधव, आ. जयंत आसगावकर, आ. ऋतुराज पाटील यांचेसह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नेत्यांच्या नेतृत्वाखाली किणी टोल नाका येथे टोल बंद आंदोलन करण्यात आले होते. सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत हे आंदोनल सुरू होते. या दरम्यान दोन्ही बाजूने वाहतूक सुरू होती तर टोल वसुली बंद होती. आंदोनलातील मागण्यांची पूर्तता होत नव्हती. यादरम्यान आंदोलक व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेच्या फेऱ्या लांबल्याने कार्यकर्त्यांचा संयम सुटला त्यांनी थेट महामार्गावर ठाण मांडत दोन्ही बाजूची वाहतूक रोखुन धरली. सुमारे तासभर वाहतूक खोळंबल्याने दोन्ही बाजूस मोठ्या रांगा लागल्या. आंदोलक व प्राधिकरण अधिकारी यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यावेळी महामार्ग रोखून धरणाऱ्या कार्यकर्त्यांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतची फिर्याद वडगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी योगेश राक्षे यांनी दिली.