Kolhapur Kadvi Dam 'over flow'
कडवी धरण ‘ओव्हर फ्लो’ Pudhari Photo
कोल्हापूर

Kolhapur Rain : कडवी धरण ‘ओव्हर फ्लो’

पुढारी वृत्तसेवा

विशाळगड : सुभाष पाटील

शाहूवाडी तालुक्यातील कडवी खोऱ्याला वरदान ठरलेले निनाई परळे येथील कडवी धरण आज (सोमवार) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारस ओव्हर फ्लो झाले. धरणातील सांडव्यावरून पूर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग कडवी नदीपात्रात होत असल्याची माहिती कडवी धरण शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी दिली. गेल्या चोवीस तासांत धरण क्षेत्रात १५४ मिमी पाऊस झाला. धरणाच्या विद्युत गृहातून २२० क्यूसेक पाण्याचा विसर्ग कडवी नदीपात्रात सुरू आहे.(Kolhapur Rain)

कडवी धरणाची पाणी साठवण क्षमता २.५१ टीएमसी आहे. धरणाची पाणीपातळी ६०१.२५ मीटर तर ७१.२४० दलघमी पाणीसाठा आहे. धरण पाणलोट क्षेत्रात तीन हजार ते साडेतीन हजार मिमी इतका पाऊस पडतो. गतवर्षी धरण तीनदा ओव्हर फ्लो झाले. गतवर्षी याच दिवशी धरणाचा पाणीसाठा ४९.६० दलघमी इतका होता. धरण ७० टक्के भरले होते. गतवर्षीपेक्षा धरणात ३० टक्के पाणीसाठा अधिक आहे. सध्या धरणातून प्रतिसेकंद २२० क्यूसेस पाण्याचा विसर्ग कडवी नदीपात्रात सुरू असल्याने वालुर, सुतारवाडी, करुंगळे, भोसलेवाडी, पेरिड, शिरगाव, सावर्डे, पाटणे या आठ ठिकाणच्या कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तसेच कडवी नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे.(Kolhapur Rain)

परळे निनाई, भेंडवडे, लोळाणे, पुसार्ले, आळतूर, वारूळ, करुंगळे, निळे, कडवे, येलूर, पेरिड, भोसलेवाडी, गाडेवाडी, मलकापूर, कोपार्डे, सांबु, शिरगाव, ससेगाव, सावर्डे, मोळवडे, सवते, शिंपे, पाटणे या २२ गावांना या धरणाचा शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वापर होत असतो.(Kolhapur Rain)

पाण्याचे योग्य नियोजन केल्याने मे अखेर ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी एकदाही पाणी उपसाबंदी करण्यात आली नाही. लांबलेला पाऊस, घटत चाललेला पाणीसाठा यामुळे पाणीबाणी निर्माण होते की काय? याची चिंता कडवी नदीकाठावरील २२ गावांना लागली होती. मात्र पावसाच्या दमदार आगमनाने २२ दिवसांत कडवी धरण पुर्ण क्षमतेने वाहू लागल्याने नागरिकांची चिंता मिटली आहे. गतवर्षी हे धरण २९ जुलै रोजी भरले होते. (Kolhapur Rain)

कडवी पाणलोट क्षेत्रात आजअखेर १८५७ मिमी पाऊस बरसला आहे. गतवर्षी हा आकडा १३९४ मिमी होता. कडवी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठची ऊस व भाताची पिके पाण्याखाली गेली आहेत. अनेक ठिकाणी ओढ्यांचे पाणी पिकांमध्ये शिरले आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असुन, अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Kolhapur Rain)

कडवी व कासारी धरणाची (दि २२) स्थिती :

धरण       पाणीपातळी मी     पाणीसाठा दलघमी        टीएमसी        टक्के

कडवी           ६०१.२५               ७१.२४                  २.५२        १००

कासारी         ६१८.४०               ५६.२८                  १.९९          ७१.६४

SCROLL FOR NEXT